दलित महिला आमदाराचा मंदिर प्रवेश, स्थानिकांनी गंगाजलाने मूर्तीला घातलं स्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 01:16 PM2018-08-01T13:16:08+5:302018-08-01T13:22:25+5:30
अजूनही आपल्या देशाची जाती-धर्माच्या जोखडातून सुटका झाली नसल्याचेच चित्र काही उदाहरणांमधून वारंवार समोर येत आहे. असाच काहीसा चीड आणणारा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे.
नवी दिल्ली - अजूनही आपल्या देशाची जाती-धर्माच्या जोखडातून सुटका झाली नसल्याचेच चित्र काही उदाहरणांमधून वारंवार समोर येत आहे. असाच काहीसा चीड आणणारा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये जाती-पातीवरुन एक लाजीरवाणी घटना घडली आहे. केवळ एका दलित महिला आमदारानं देवदर्शन केले म्हणून येथील मंदिर गंगाजलाने धुण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भाजपाच्या आमदार मनिषा अनुरागी यांनी धूम ऋषि आश्रम मंदिरात पूजा-अर्चना केली. मात्र अनुरागी मंदिरातून बाहेर पडताच मंदिर गंगाजलानं धुण्यात आले. मनिषा अनुरागी केवळ दलित आहेत, म्हणून मंदिर गंगाजलनं धुण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
12 जुलैला आमदार मनिषा हमीरपूर जिल्ह्यातील मुस्करा खुर्द गावात एका शालेय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. सभारंभ पार पडल्यानंतर त्या शाळेतून धूम ऋषि मंदिर दर्शनासाठी निघाल्या. आमदार मनिषा अनुरागी यांनी मंदिर दर्शन केल्याची माहिती येथील स्थानिकांना समजताच, मंदिर अपवित्र झाल्याची ओरड करत त्यांनी मंदिर आणि मंदिरातील मूर्ती गंगाजलानं धुतली.
स्थानिकांनी वर्गणी गोळा करत धूम्र ऋषिची मूर्ती अलाहाबादमध्ये आणली आणि तेथे मूर्तीला गंगाजलानं आंघोळ घातली. यानंतर मंदिरात मूर्तीची स्थापना केली. मंदिरातील एका पुजारीनं सांगितले की, ‘आतापर्यंत या मंदिरात कोणत्याही महिलेनं प्रवेश केला नव्हता. ज्यावेळेस मनिषा यांनी मंदिरप्रवेश केला त्यावेळेस मी तेथे हजर नव्हतो. मी मंदिरात असतो तर त्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नसता. येथे महिलांना मंदिर प्रवेश करण्यास परवानगी नाहीय''
दरम्यान, मनिषा अनुरागी उत्तर प्रदेशातील राठ मतदारसंघातील आमदार आहेत. मंदिर प्रवेश करुन काहीही अयोग्य असे वर्तन केलेले नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा यांनी दिली आहे. 'मंदिरात महिलांना प्रवेश नाही, याबाबतची माहिती नव्हती. तसेच मंदिरात प्रवेश करुन मी काहीही चूक केलेले नाही', असं म्हणत मनिषा यांनी आपल्या मतावर ठाम असल्याचं सांगितलं.