"नवविवाहित जोडप्यांना सरकार देणार रोजगार", योगी सरकारच्या मंत्र्याची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:19 PM2022-12-15T15:19:05+5:302022-12-15T15:19:49+5:30
उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकार नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी आणि रोजगार देईल, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री दयाशंकर सिंग यांनी बुधवारी बलिया जिल्ह्यातील बांसडीह पीजी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना ही माहिती दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी यावेळी यूपी सरकारच्या धोरणांबद्दल भाष्य केले. "मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह केले जात आहेत. सामूहिक विवाहानंतर या नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या पात्रतेनुसार सरकारकडून नोकरीही दिली जाईल." तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य लोकांचा विकास केला जात आहे, असे सिंग यांनी आणखी म्हटले.
506 जोडपी अडकली विवाहबंधनात
बांसडीह पीजी कॉलेज कॅम्पस, बलिया येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील विविध ब्लॉकमधील 506 जोडप्यांनी नवीन आयुष्याला सुरूवात केली. परिवहन मंत्री दयाशंकर सिंग आणि स्थानिक आमदार केतकी सिंग यांनी नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू आणि आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदन केले. याशिवाय नवविवाहित जोडप्यांना सुखी आयुष्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
काय आहे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना?
उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुली, विधवा महिला, घटस्फोटित महिलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"