पंख्याला हात लावताच विजेच्या जोरदार धक्का; चार सख्या भावंडांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 08:46 PM2023-11-19T20:46:53+5:302023-11-19T20:47:16+5:30
या धक्कादायक घटनेने गावावर शोककळा पसरली.
उन्नाव: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील पंख्यामुळे विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ चारही मुलांना शॉक लागल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी चार भाऊ-बहिणीच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ उडाली.
उन्नाव जिल्ह्यातील बारसगवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालमन खेडा गावात ही घटना घडली. गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार यांच्या 9 वर्षीय मयंक, 2 वर्षीय हिमांशी, 6 वर्षीय हिमांक आणि 4 वर्षीय मानसीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व मृत मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले.
चारही मुले एकामागून एक पंख्याला चिकटली
रविवारी वीरेंद्र सिंह पत्नीसह शेतात गेले होते. त्यांची मुले घरीच होती. घरात पंखा लावला, त्यातून विद्युत प्रवाह येत होता. अचानक एका मुलाला पंख्याचा विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने तो ओरडू लागला. दुसऱ्या मुलाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. यानंतर एक एक करून चारही मुलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
घरातून लहान मुलांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. मुलांचा वेदनादायक मृत्यू पाहून उपस्थितांनाही धक्का बसला. याची माहिती वीरेंद्र आणि त्यांच्या पत्नीला मिळताच त्यांनी आक्रोश केला. ज्या घराच्या अंगणात चिमुकले खेळायचे, त्याच घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरले.