Uttar Pradesh Uttarakhand Exit Poll: दोन राज्यांत भाजप इतिहास घडवण्याच्या तयारीत; मोदी-शहांच्या रणनीतीनं विरोधकांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:32 PM2022-03-07T20:32:46+5:302022-03-07T20:35:09+5:30
Uttar Pradesh Uttarakhand Exit Poll: पाच वर्षांनंतर सत्ताबदलाची परंपरा असलेल्या राज्यांमध्ये भाजप चमत्कार घडवण्याच्या वाटेवर
नवी दिल्ली: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष इतिहास घडवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचं एक्झिट पोल सांगतात. या दोन राज्यांत दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो असा इतिहास आहे. मात्र यंदा भाजप इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.
उत्तर प्रदेशात कमळच, सपा सत्तेपासून दूरच
रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा उत्तर प्रदेशमध्ये अडीचशेपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षही १०० हून अधिक जागांवर विजयी होईल, असा कल रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ४५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ३५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये रूपांतर केले असता उत्तर प्रदेशात भाजपाला २६२ ते २७७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाला ७ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही ९ पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसारही उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला २११ ते २२५, समाजवादी पक्षाला १४६ ते १६०, बसपाला १४ ते २४ आणि काँग्रेसला ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपचीच सत्ता कायम राहणार
टाईम्स नाऊ-व्हिटोच्या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला ४४ ते ५० जागा मिळू शकतात. काँग्रेसला १२ ते १५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला ५ ते ८ जागांवर यश मिळू शकतं. उत्तराखंडात विधानसभेच्या ७० जागा आहेत.
इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला ३६ ते ४६ जागा मिळू शकतील. तर काँग्रेसला २० ते ३० जागांवर समाधान मानावं लागेल. न्यूज २४ चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ४३, काँग्रेसला २४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक पी मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३६ ते ४२, तर काँग्रेसला २५ ते ३१ जागा मिळण्याची अंदाज वर्तवला गेला आहे.