उत्तर प्रदेश : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या लखीमपूरमध्ये कुणाला मिळणार कौल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:30 AM2022-02-22T09:30:17+5:302022-02-22T09:31:41+5:30
मंत्र्यांचा राजीनामा न घेतल्याने संताप; विकासकामे, जातीची गणितेही प्रभावी ठरणार
योगेश बिडवई
टिकुनिया (लखीमपूर खिरी) : देशातील शेतकरी आंदोलनावेळी भाजपच्या मंत्रिपुत्राच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेने देशभरात चर्चेत आलेेल्या लखीमपूरमध्ये मतदारांचा कौल कुणाला मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याची टिकुनिया येथील संतापजनक घटना लखीमपूर खिरी जिल्ह्यात निवडणुकीचा मुद्दा बनली आहे. शेती, ग्रामीण भागातील विकासकामे, सुरक्षा हे मुद्देही निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत.
लखीमपूर खिरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. टिकुनिया हे गाव निघासन या विधानसभा मतदारसंघात येते. लखनौपासून २३६ किलोमीटरवरील टिकुनिया गावातील संतापजनक घटनेची जगभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती. साधारण १६ हजार लोकसंख्या असलेल्या टिकुनियातील घटनास्थळावर गेल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण भागातील हा रस्ता फारसा रहदारीचा नाही. मात्र, केंद्रीय कृषी कायद्यांना शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव गाड्यांनी चिरडून टाकण्याचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो.
गाडीखाली चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कानठळ्या बसविणाऱ्या किंकाळ्या तुमच्या कानात घुमल्याशिवाय राहत नाही. या घटनेनंतर मंत्री अजयकुमार मिश्र यांचा राजीनामा न घेतल्याचा येथील लोकांमध्ये राग आहे.
‘मला टिकुनियात येऊन ४० वर्षे झाली. मी पंजाबमधून येथे शेती करण्यासाठी आलो. अर्धा एकर जमीन विकत घेतली. त्यात गहू करतो. सरकार आमचे एेकत नाही. शेतकरी समाधानी नाही,’ असे येथील शीख समुदायातील एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. तर टिकुनियातील घटनेचा प्रभाव एका ठराविक वर्गापुरताच आहे. ही घटना निवडणुकीचे गणित बदलेल, असे वाटत नसल्याचे स्थानिक पत्रकार शुभम कश्यप यांनी सांगितले. येथे बिरादरीचा मुद्दा नाही. बाबाला (योगी आदित्यनाथ) चोर, भामटे घाबरतात, असे स्थानिक व्यापारी बजरंग गोयल यांनी सांगितले.
सपा-भाजपमध्ये चुरशीची लढत
निघोसन मतदारसंघात भाजप व समाजवादी पार्टीतच मुख्य लढत आहे. भाजपचे विद्यमान आमदार शशांक वर्मा यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांचे वडील योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर शशांक पोटनिवडणुकीत विजयी झाले. बसपाचे दोनवेळा आमदार राहिलेले आर. एस. कुशवाह यंदा समाजवादी पक्षातून नशीब आजमावत आहेत.
छोटे शेतकरी कोणाच्या बाजूने?
ऊस उत्पादक व इतर शेतकऱ्यांचे प्रश्नही येथे चर्चेत आहेत. या भागात छोट्या शेतकऱ्यांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. शेतमजुरांची संख्याही मोठी आहे.
ओबीसी, दलितांची मते कोणाला?
टिकुनियातील घटनेत शीख समुदायातील शेतकरी मारले गेले. या मतदारसंघात शीख समुदायाची सुमारे दहा टक्के मते आहेत. त्याशिवाय मौर्य, कश्यप, चौहाण, वर्मा अशा इतर मागासवर्गीय व दलित समाजातील मतदारांचीही मोठी संख्या आहे. मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक ठरतील.