यूपीमध्ये 2024 पर्यंत अमेरिकेसारख्या रस्ते पायाभूत सुविधा असतील, नितीन गडकरींनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:30 PM2023-02-27T18:30:31+5:302023-02-27T18:48:53+5:30

Nitin Gadkari : उत्तर प्रदेश हे देशातील आघाडीचे राज्य बनेल, असे सांगत नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अन्नाबरोबरच ऊर्जा देणारे बनण्याचे आवाहन केले.

Uttar Pradesh will have road infrastructure like america by 2024 nitin gadkari promised | यूपीमध्ये 2024 पर्यंत अमेरिकेसारख्या रस्ते पायाभूत सुविधा असतील, नितीन गडकरींनी दिले आश्वासन 

यूपीमध्ये 2024 पर्यंत अमेरिकेसारख्या रस्ते पायाभूत सुविधा असतील, नितीन गडकरींनी दिले आश्वासन 

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा (Road Infrastructure) अमेरिकेसारख्या असतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) केले आहे. 2024 हे वर्ष संपण्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अमेरिकेप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा असतील आणि रस्त्यांच्या विकासामुळे राज्याचे चित्र बदलेल. उत्तर प्रदेश हे देशातील आघाडीचे राज्य बनेल, असे सांगत नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अन्नाबरोबरच ऊर्जा देणारे बनण्याचे आवाहन केले. 

तत्पूर्वी, नितीन गडकरी यांनी बलिया येथील चितबडगाव येथे 6,500 कोटी रुपयांच्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. नितीन गडकरी म्हणाले, "2014 पूर्वी उत्तर प्रदेशातील रस्त्यांची स्थिती चांगली नव्हती. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग 7,643 किमीवरून 13,000 किमीपर्यंत वाढला आहे. 2024 साल संपण्यापूर्वी उत्तर प्रदेशात अमेरिकेप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा असतील. राज्याचा विकास झपाट्याने होत असून रस्त्यांच्या विकासाने त्याचे चित्र बदलेल. राज्यातील गावे आणि गरीब सुखी आणि समृद्ध होतील. तरुणांनाही रोजगार मिळेल आणि यूपी देशाचे आघाडीचे राज्य बनेल."

बलिया लिंक एक्स्प्रेस वेच्या निर्मितीमुळे लखनौहून पाटण्याला पूर्वांचल द्रुतगती मार्गाने साडेचार तासात पोहोचणे शक्य होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, "बलिया ते बक्सर अर्ध्या तासात, बलिया ते छपरा एका तासात आणि बलिया ते पाटणा दीड तासात पोहोचू शकतो. ग्रीनफिल्ड हायवेच्या (Green Field Highway) निर्मितीमुळे पूर्व उत्तर प्रदेशला बिहारमधील बक्सर छपरा, पाटणाशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल." याचबरोबर, बलिया येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला आता लखनौ, वाराणसी आणि पाटणा येथील मंडईंमध्ये सहज उपलब्ध होणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

130 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा चांदौली ते मोहनिया हा नवीन रस्ता उत्तर प्रदेशातील चंदौली आणि बिहारमधील कैमूर जिल्ह्याला दिल्ली-कोलकाता जीटी रोडशी जोडेल. याशिवाय, सैदपूर ते मर्दाह रस्त्याच्या बांधकामामुळे मऊ ते वाराणसी मार्गे सैदपूरला थेट जोडले जाणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. याचबरोबर, राज्यातील इतर शहरांशी उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे उत्तर प्रदेशची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारेल. यासोबतच आझमगड जिल्ह्यातील मागास भागांनाही नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी बलिया-आरा दरम्यान 1500 कोटी रुपये खर्च करून 28 किलोमीटर लांबीच्या नवीन लिंक रोडची घोषणाही केली.

Web Title: Uttar Pradesh will have road infrastructure like america by 2024 nitin gadkari promised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.