खूषखबर! राज्य सरकारकडून एचआरए दुप्पट; 15 लाख कर्मचाऱ्यांची चांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 06:29 PM2018-07-17T18:29:40+5:302018-07-17T18:32:31+5:30
राज्याच्या तिजोरीवर 2023 कोटी रुपयांचा भार पडणार
लखनऊ: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनं राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एचआरए दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याचा फायदा 15 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना होणार आहे.
कर्मचाऱ्यांचा एचआरए दुप्पट करण्यात आल्याची माहिती लोकभवनमधील कॅबिनेट बैठकीनंतर राज्य सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी पत्रकारांना दिली. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, राज्य सरकारच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा भत्ता दुप्पट करत असल्याचा निर्णय राज्य सरकारनं कॅबिनेट बैठकीत घेतला. याचा फायदा 15 लाख कर्मचारी आणि शिक्षकांना होईल. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर 2023 कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
2008 मध्ये नगर भत्ता निश्चित करण्यात आला होता. आता हा भत्ता दुप्पट करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. 'आता किमान भत्ता 340 रुपये, तर कमाल भत्ता 900 रुपये असेल. यामुळे सरकारवर 175 कोटी रुपयांचा भार पडेल. जुलै 2018 पासून कर्मचाऱ्यांना वाढलेला भत्ता दिला जाईल,' असंही त्यांनी सांगितलं.