उत्तर प्रदेशातही व्यापम घोटाळा, 600 डॉक्टरांचा केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 12:59 PM2018-03-21T12:59:38+5:302018-03-21T12:59:38+5:30
मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा समोर आला आहे. जवळपास 600 एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
लखनऊः मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा समोर आला आहे. जवळपास 600 एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे रॅकेट 2014पासून कार्यरत आहे, जे पैशांच्या मोबदल्यात वैद्यकीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पास करण्यास मदत करायचे.
विशेष म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं सेटिंग लावून पास झालेले विद्यार्थी आता डॉक्टर म्हणून वावरत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी मुजफ्फरनगरमधल्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी कॉफीचं रॅकेट चालवणा-यांना एक-एक लाख रुपये दिल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक विद्यार्थ्यांची नावं समोर आली आहेत.
तसेच याशिवाय चौधरी चरण सिंह विद्यापीठातील 6 अधिका-यांसमवेत अन्य 9 जणांची चौकशी करण्यात आली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी हे अधिकारी मदत करायचे. पोलिसांच्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनीनं अटकेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची रॅकेट माफियांशी ओळख करून दिली होती. आता पोलिसांच्या रडारवर ती विद्यार्थिनी आहे. परंतु अद्याप त्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आलेली नाही.