उत्तर प्रदेशातील आठ मंत्र्यांना डच्चू
By admin | Published: October 29, 2015 10:21 PM2015-10-29T22:21:47+5:302015-10-29T22:21:47+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी एक मोठा निर्णय घेत आपल्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू दिला असून नऊ मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी एक मोठा निर्णय घेत आपल्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू दिला असून नऊ मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. यादवांनी दिवाळीपूर्वी केलेल्या या राजकीय धमाक्याने अनेकांना धक्के बसले आहेत.
राज्याचे राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून पाच कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांना पदमुक्त केले आहे. फेरबदलानंतर नव्या मंत्र्यांना ३१ आॅक्टोबरला राजभवनात आयोजित कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल.
हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांच्या विभागांची जबाबदारी तूर्तास मुख्यमंत्री स्वत: सांभाळतील,अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली. याशिवाय ज्या नऊ मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली आहेत त्यांच्याही विभागाचे कामकाज अतिरिक्त कारभाराच्या रूपात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपविले आहे. हे मंत्री बिनखात्याचे पदावर राहतील.
अखिलेश यादव यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात बुधवारी रात्री राज्यपालांची भेट घेतली होती. फेरबदलात मुख्यमंत्री काही मंत्र्यांची हकालपट्टी करतील,असे मानले जात आहे. यादव यांनी दोन दिवसांपूर्वीच बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात जास्तीतजास्त ६० मंत्री राहू शकतात. ताज्या घटनाक्रमात आठ मंत्र्यांना पदमुक्त करण्यात आल्यानंतर मंत्रिमंडळात रिक्त पदांची संख्या वाढून १४ झाली आहे. (वृत्तसंस्था)
आरोग्यमंत्री अहमद हसन, उद्योग व खाद्य प्रक्रिया मंत्री पारसनाथ यादव, प्राथमिक शिक्षण मंत्री रामगोविंद चौधरी, वादग्रस्त अन्न व पुरवठा मंत्री रघुराजप्रताप सिंग ऊर्फ राजाभय्या, माध्यमिक शिक्षण मंत्री महबूब अली, समाजकल्याण मंत्री अवधेश प्रसाद, परिवहन मंत्री दुर्गाप्रसाद यादव, होमगार्डस् मंत्री ब्रह्माशंकर त्रिपाठी आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री इकबाल महमूद.
कॅबिनेट मंत्री- राजा महेंद्र अरिदमन सिंग (स्टॅम्प व न्यायालय शुल्क,नोंदणी आणि नागरी सुरक्षा), अंबिका चौधरी (मागासवर्गीय आणि विकलांग कल्याण), शिवकुमार बेरिया (वस्त्र आणि रेशीम उद्योग), नारद राय (खादी व ग्रामोद्योग), शिवकांत ओझा (तंत्र शिक्षण)
राज्यमंत्री-आलोककुमार शाक्य (तंत्रशिक्षण), योगेशप्रताप सिंग ऊर्फ योगेश भय्या (प्राथमिक शिक्षण),भगवत शरण गंगवार (सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग व निर्यात प्रोत्साहन,स्वतंत्र कारभार)