मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, यूपीची व्यवस्था सुधारेन, आजोबा बसले आंदोलनाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 08:07 PM2022-11-16T20:07:57+5:302022-11-16T20:12:36+5:30
एक दिवसांचा मुख्यमंत्री करा या मागणीसाठी आजोबा आंदोलनाला बसले आहेत.
मथुरा : मथुराचे रहिवासी असलेले प्रकाश चंद्र अग्रवाल यांना अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटाप्रमाणे एका दिवसासाठी यूपीचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. या मागणीसाठी ते आता बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. आपल्या मागणीसाठी प्रयागराजच्या पोलीस चौकीबाहेर ते निदर्शने करत आहेत. यूपीमध्ये अनेक यंत्रणा सुधारण्याची गरज आहे आणि अनेक त्रुटी दिसत आहेत. जर एका दिवसासाठी मी मुख्यमंत्री झालो तर ते दूर करेन असे संबंधित आजोबा म्हणत आहेत. खरं तर एक दिवसाच्या कार्यकाळाची रूपरेषाही त्यांनी तयार केली आहे.
प्रकाश अग्रवाल यांनी नायक चित्रपट पाहिला आहे. ते त्यातील अनिल कपूरच्या भूमिकेने फार प्रभावित झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मला प्रशासनाच्या व्यवस्थेत सुधारणा करायची आहे आणि त्यामुळे यूपीचा मुख्यमंत्री बनवले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी ३ ऑक्टोबरपासून मथुरा येथून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आजोबांनी प्रयागराज उच्च न्यायालयाजवळील आंबेडकर पुतळ्याजवळ १० ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू केले. यानंतर प्रकाशचंद्र अग्रवाल यांनी तेथून आंदोलनाचे ठिकाण हलवून प्रयागराज येथील पोलीस चौकीवर धरणे आंदोलन सुरू केले.
...म्हणून बनायचे आहे मुख्यमंत्री
प्रकाश अग्रवाल यांचे वडील पेशाने दूध व्यावसायिक होते. प्रकाशचंद्र अग्रवाल यांना एक बहीण देखील आहे. प्रकाश अग्रवाल जवळपास ६५ वर्षांचे आहेत, मात्र त्यांनी लग्न देखील केले नाही कारण त्यांना यूपीच्या प्रशासन व्यवस्थेत अनेक सुधारणा करायच्या होत्या. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात भ्रष्ट अधिकारी आणि खराब व्यवस्थेबाबत अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. या व्यवस्थेत पसरलेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका आणि अनेक याचिकाही दाखल केल्या आहेत.
भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करणार नाही
प्रकाशचंद्र अग्रवाल म्हणाले की, १ दिवसासाठी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करणार नाही, तर त्याचे डिमोशन करेन. त्यांनी एका दिवसासाठी मुख्यमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, यूपीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवले आहे. मात्र त्यांना एका दिवसासाठी मुख्यमंत्री करण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"