उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ओमपाल मेहरा बडतर्फ
By admin | Published: December 26, 2015 02:34 AM2015-12-26T02:34:36+5:302015-12-26T02:34:36+5:30
अयोध्या येथील राम मंदिर बांधण्यासाठी मुस्लिमांनी मदत करावी, असे आवाहन करणे उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ओमपाल नेहरा यांना चांगलेच महागात पडले आहे. मुस्लिमांनी ‘कर सेवा’ करावी
लखनौ : अयोध्या येथील राम मंदिर बांधण्यासाठी मुस्लिमांनी मदत करावी, असे आवाहन करणे उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री ओमपाल नेहरा यांना चांगलेच महागात पडले आहे. मुस्लिमांनी ‘कर सेवा’ करावी, असे सांगणारे नेहरा यांची राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी केली.
नेहरा हे समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळालेला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी नेहरा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले,’ अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र चौधरी यांनी शुक्रवारी दिली.
विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्या येथे दोन ट्रक भरून दगड आणल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यादव
यांनी आपल्या राज्यमंत्र्याविरुद्ध ही कारवाई केली. नेहरा हे राज्याच्या मनोरंजन कर विभागाचे सल्लागार होते. ‘विहिंपसारख्या संघटनांची ओळख पुसून टाकण्यासाठी आता मुस्लिमांनी पुढे यावे आणि अयोध्या व मथुरा येथील वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यासाठी मदत करावी,’
असे आवाहन नेहरा यांनी गेल्या २३ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात म्हटले होते. ‘राम मंदिर अयोध्येत नाही तर मग कुठे बांधायचे? जेथे कृष्णाची पूजा केली जाते त्या मथुरेत मशीद कशी का राहू शकते? मुस्लिमांनी याचा विचार केला पाहिजे आणि या ठिकाणी मंदिर बांधा असे म्हणत कर सेवेसाठी पुढे आले पाहिजे. आपण विहिंपच्या जाळ्यात अडकता कामा नये,’ असे नेहरा म्हणाले होते. (वृत्तसंस्था)