उत्तरप्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर
By admin | Published: December 30, 2016 03:26 PM2016-12-30T15:26:13+5:302016-12-30T15:29:07+5:30
उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिता पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्यातील...
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 30 - उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिता पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्यातील तिकीट वाटपावरुन तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुलायमसिंह यादव यांनी सपाच्या 325 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी अखिलेश समर्थकांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा होती.
अखेर अखिलेश यादव यांच्या संमतीने गुरुवारी रात्री उशिरा 235 उमेदवारांची यादी तयार झाली आहे. ही यादी ते कुठल्याही क्षणी जाहीर करु शकतात. असे घडल्यास समाजवादी पक्षाची दोन शकले पडतील. ज्यांना तिकीट मिळाले आहे त्या सर्व उमेदवारांची उद्या सकाळी 10.30 वाजता मुलायमसिंह यादव यांनी बैठक बोलवली आहे.
उद्या होणारी सपाची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. मुलायमसिंह यादव उमेदवारांच्या भावना जाणून घेतील तसेच यादीचा फेरआढावाही घेतला जाईल. सपावर नियंत्रण मिळवण्यावरुन शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील संघर्षातून पक्ष फुटीच्या उंबरठयावर पोहोचला आहे. अखिलेश यांचे समर्थन असलेली 235 उमेदवारांची यादी सोशल मीडियावर फिरत आहे. यावर कुठलीही स्वाक्षरी नाही. सपाचे तिकीट न मिळालेल्या एका अखिलेश समर्थकाने ही यादी पोस्ट केली आहे.