उत्तर प्रदेशमध्ये 'यादवी' : रामगोपाल यादवांची सपामधून हकालपट्टी
By admin | Published: October 23, 2016 05:47 PM2016-10-23T17:47:22+5:302016-10-23T18:15:17+5:30
पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत सपा अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी रविवारी प्रा. रामगोपाल यादव यांची सपामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 23 - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षामधून समाजवादी पार्टीप्रमुख मुलायम सिंग यादव यांच्या परिवारात उभी फूट पडली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी रविवारी प्रा. रामगोपाल यादव यांची सपामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तसेच रामगोपाल यांना पक्षातील सर्व पदांवरूनही दूर करण्यात आले आहे.
तत्पूर्वी शिवपाल यादव यांनी रामगोपाल यादव यांच्यावर गंभीर आरोप केले. "रामगोपाल यादव हे नेहमी पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले होते. पक्षाला कमकुवत करण्यासाठी त्यांनी अनेक कारस्थाने केली. तसेच घोटाळ्यात अडकलेला मुलगा आणि सुनेला वाचवण्यासाठी प्रा. रामगोपाल यादव यांनी भाजपाशी हातमिळवणी केली." असे शिवपाल यादव म्हणाले.
रविवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांना कॅबिनेट मंत्रीपदावरून डच्चू दिला होता. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंग यांच्या परिवारात आरोप प्रत्यारोपांना उत आला होता. दरम्यान, शिवपाल यादव यांनी रविवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रामगोपाल यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत त्यांच्या पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली. तत्पूर्वी रामगोपाल यादव यांनी रविवारी सकाळी सपा कार्यकर्त्यांना पत्र लिहून अखिलेश यादव यांच्या विरोधकांवर निशाणा साधला होता.