‘संजीवनी’ शोधण्यासाठी उत्तराखंडची मोहीम
By Admin | Published: July 31, 2016 05:26 AM2016-07-31T05:26:01+5:302016-07-31T05:27:24+5:30
‘संजीवनी बुटी’चा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकार येत्या आॅगस्टपासून एक महत्त्वाकांक्षी शोधमोहीम हाती घेणार आहे.
डेहरादून : मरणासन्न अशा मूर्च्छितावस्थेत असलेल्या व्यक्तीलाही मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचे चमत्कारी गुणधर्म असल्याची आख्यायिका असलेली ‘संजीवनी बुटी’चा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकार येत्या आॅगस्टपासून एक महत्त्वाकांक्षी शोधमोहीम हाती घेणार आहे.
उत्तराखंडचे ‘आयुष’मंत्री सुरेंद्र सिंग नेगी यांनी सांगितले की, सरकारने या शोधमोहिमेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवाय आयुर्वेदिक वैद्यांसह अन्य तज्ज्ञांची एक समितीही त्यासाठी स्थापन केली आहे.
शुक्रवारी नेगी यांनी घेतलेल्या एका बैठकीत या प्रस्तावित शोधमोहिमेचा ढोबळ आराखडा ठरविण्यात आला. येत्या आॅगस्टपासून चीनच्या सीमेलगत असलेल्या चमोली जिल्ह्यातील हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतरांगांमध्ये ‘संजीवनी’चा शोध सुरू केला जाईल.
या शोधमोहिमेस नक्की यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करून नेगी म्हणाले की, नेटाने केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. निश्चय पक्का असेल तर अपयश येण्याचे काही कारण नाही.
भाजपा प्रणीत नरेंद्र मोदी सरकार दिल्लीत सत्तेवर आल्यापासून आयुर्वेद आणि संबंधित भारतीय वैद्यकाच्या पुनरुज्जीवनास चांगले दिवस आले आहेत. ‘हिंदू अजेंड्या’चा एक भाग म्हणून मोदी सरकार हिंदू धर्म, त्यांची धार्मिक स्थळे व धर्मग्रंथ यांच्याशी संबंधित स्थळे व वस्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यात विशेष स्वारस्य दाखवीत आहे. मात्र उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारने ‘संजीवनी’चा शोध घ्यावा, हे विशेष.
या मोहिमेस मात्र केंद्र सरकारने मदत करण्यास नकार दिल्याने राज्य सरकार स्वत:च ही मोहीम हाती घेत आहे, असे नेगी यांनी स्पष्ट केले. उत्तराखंड सरकारने ‘संजीवनी’चा शोध घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन २००८मध्ये राज्याचे तत्कालीन ‘आयुष’मंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनीही असा प्रयत्न
केला होता. पण त्यास यश आले नव्हते. हेच निशांक पुढे मुख्यमंत्रीही झाले होते.
सन २००९मध्ये हृषीकेश येथील पतंजली आयुर्वेदच्या एका तुकडीने ‘संजीवनी’ सापडल्याचा दावा केला होता. परंतु त्यांनी ‘संजीवनी’
म्हणून आणलेली वनस्पती नंतर गुणात्मक चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली नव्हती. (वृत्तसंस्था)
-उत्तराखंड सरकारने निश्चित अशी योजना दिली तर त्यात सहभागी होण्यास आम्हाला आवडेल. हिमालयात शेकडो वनस्पती आहेत. त्यापैकी ‘संजीवनी’ म्हणून नेमकी कोणती वनस्पती शोधायची याचा अभ्यास आधी करावा लागेल.
- डॉ. के. एस. धीमन, संचालक,
केंद्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद