पक्षश्रेष्ठींची नाराजी! उत्तराखंडचे CM त्रिवेंद्र सिंह रावत यांचा अखेर राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 04:42 PM2021-03-09T16:42:15+5:302021-03-09T16:43:05+5:30
त्रिवेंद्र सिंह रावत यांना हटवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिल्लीत येऊन भाजप (BJP) नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या.
नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना हटवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिल्लीत येऊन भाजप (BJP) नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र, अखेरीस त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपुर्द केला आहे. यानंतर आता उत्तराखंड राज्याची धुरा कोणाकडे सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (uttarakhand cm trivendra singh rawat submits his resignation to governor baby rani maurya)
उत्तराखंडमधील ही मोठी राजकीय उलथापालथ असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवल्याचे सांगितले जात आहे. जेपी नड्डा आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यात दोन वेळा बैठका होत्या. नड्डा यांच्यासोबत रावत यांची जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेनंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे रावत यांनी उत्तर दिले नाही व ते दिल्लीकडे रवाना झाले होते.
Uttarakhand CM Trivendra Singh Rawat submits his resignation to Governor Baby Rani Maurya. He met BJP leaders in Delhi yesterday. pic.twitter.com/7oKkgZUwBm
— ANI (@ANI) March 9, 2021
पक्षाकडून सुवर्ण संधी
त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ''भाजपने मला मुख्यमंत्रीपदाची सुवर्ण संधी दिली. गेली चार वर्षे उत्तराखंड राज्याची धुरा सांभाळली. पक्ष माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवेल, असा विचारही केला नव्हता. मात्र, यानंतर दुसऱ्या व्यक्तींवर मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे'', असे रावत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी
राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे सुपुर्द केला आहे. भाजपच्या आमदारांची एक बैठक उद्या सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती त्रिवेंद्र सिंह रावत यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री रावत आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यातील बैठक दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडली. भाजप उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना देहरादून येथे पोहचले. राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली. यानंतर या दोघांनी आपला अहवाल भाजप अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता.