अरे देवा, भाजपच्या 'या' मुख्यमंत्र्यांनी ११ महिन्यांत नुसत्या चहापानावर खर्च केले ६८ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:22 AM2018-02-07T06:22:55+5:302018-02-07T06:24:19+5:30
उत्तराखंडसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह राव यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या ११ महिन्यांत पाहुण्यांच्या चहापाण्यावर तब्बल ६८ लाख रुपये खर्च केले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.
देहरादून : उत्तराखंडसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह राव यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या ११ महिन्यांत पाहुण्यांच्या चहापाण्यावर तब्बल ६८ लाख रुपये खर्च केले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.
उत्तराखंडमध्ये २0१७ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. रावत यांनी १८ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. ते मुख्यमंत्री होऊ न अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी पाहुणचारावर किती खर्च केला, अशी विचारणा माहितीच्या अधिकारात केली असता मिळालेली माहिती धक्कादायक आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पाहुण्याच्या चहापाण्यावर ६८ लाख ५९ हजार ८६५ रुपये खर्च केला. याचाच अर्थ दर महिन्याला रावत यांनी पाहुण्यांवर ६ लाख २३ हजार ६२४ रुपये खर्च केला. रावत यांनी रोज पाहुण्यांच्या चहापानावर केलेला खर्च होता तब्बल २0 हजार ७८७ रुपये. म्हणजे एका तासाला पाहुण्यांवर ८६६ रुपये खर्च मुख्यमंत्र्यांच्या केला, असे स्पष्ट होते. त्रिवेंद्र सिंह रावत उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७0 पैकी ५७ जागा जिंकल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>... तर मोठ्या राज्यांचा खर्च किती
उत्तराखंडसारख्या छोट्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचारावरील खर्च इतका असेल, तर मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री चहापाण्यावर किती खर्च करीत असतील, असा प्रश्न आता विचारला जात आहे. आता कोणी तरी अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा चहापानावरील खर्चही मागवू शकतील.