VIDEO: उत्तराखंडमध्ये ढगफुटी; डझनभर घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:17 PM2021-05-11T22:17:13+5:302021-05-11T22:20:24+5:30
Uttarakhand Devprayag Cloudburst: उत्तराखंडच्या देवप्रयामध्ये ढगफुटी झाल्यानं नदीला पूर; पात्राजवळील दुकानांचं नुकसान
देवप्रयाग: उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये ढगफुटी झाल्यानं शांता नदीला पूर आला आहे. त्यामुळे शांती बाजार परिसरात मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी असलेली आयटीआयची तीन मजली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. तर शांती नदीच्या पात्राजवळ असलेली दहापेक्षा अधिक दुकानं वाहून गेली आहेत. देवप्रयाग नगराहून बस आगाराकडे येणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.
#Cloudburst in Devoparyag of #Uttarakhand. RTI bhawan building collapsed. pic.twitter.com/YlsuOpAbAV
— Taruni Gandhi (@TaruniGandhi) May 11, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे आयटीआयसह दुकानं बंद होती. त्यामुळे जीवितहानी टळली. आज संध्याकाळी चारच्या सुमारास दशरथ डोंगरावर ढगफुटी झाली. त्यामुळे इथून वाहणाऱ्या शांता नदीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाली. शांता नदी बस आगार परिसरातून वाहत पुढे शांती बाजाराकडून भागीरथीला जाऊन मिळते. शांता नदीला पूर आल्यानं शांती बाजार परिसरात मोठं नुकसान झालं. आयटीआयचं तीन मजली भवन पुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.
#Uttarakhand: Cloudburst damages several shops and houses in Tehri district's Devprayag at around 4.45 pm today; No casualties have been reported so far pic.twitter.com/N3pUq4rIYi
— Jasleen kaur (@Jasleen_Kaur11) May 11, 2021
शांती बाजारात असलेले अनेक दुकानं नदीला आलेल्या पुरात वाहून गेली. नदीवर असलेला पूल, शेजारी असलेला रस्ता पुरात वाहून गेला. नदी पात्राजवळ असलेल्या कपड्यांच्या, मिष्ठान्नाच्या दुकानांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं. आर्थिक नुकसानीचा आकडा काही कोटींमध्ये असण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समजली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोरोना कर्फ्यू नसता, तर या भागात खूप मोठी जीवितहानी झाली असती.