Corona Vaccination: मद्यपान केल्यानंतर डॉक्टरांनी टोचून घेतली कोरोना लस; प्रकृती बिघडल्यानं खळबळ
By कुणाल गवाणकर | Updated: January 19, 2021 14:22 IST2021-01-19T14:22:05+5:302021-01-19T14:22:35+5:30
Corona Vaccination: डॉक्टरांवर रुग्णालयात उपचार सुरू; प्रकृती स्थिर

Corona Vaccination: मद्यपान केल्यानंतर डॉक्टरांनी टोचून घेतली कोरोना लस; प्रकृती बिघडल्यानं खळबळ
देहरादून: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (१६ जानेवारी) देशातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात लसीकरणास सुरुवात झाली. लस टोचण्यात आल्यानंतर आतापर्यंत देशात दोघांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नसल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. लस टोचण्यात आल्यानंतर ५०० हून अधिक जणांना साईड इफेक्ट्स जाणवले. मात्र यातील कोणाचीही स्थिती चिंताजनक नाही.
देहरादूनमधील गव्हर्नमेंट दून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे (जीडीएमसीएच) चिकित्सा अधिकारी डॉ. के. के. टम्टा यांना शनिवारी कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर रविवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना भोवळ येत होती. लस देण्यात आल्यानंतर डॉक्टरांची तब्येत बिघडल्यामुळे एकच खळबळ उडाली. इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडल्यानं डॉक्टरांची प्रकृती खराब झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
शनिवारी डॉक्टरांना कोरोना लस देण्यात आली. त्याच दिवशी त्यांनी जास्त प्रमाणात मद्य प्राशन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडल्यानं त्यांची प्रकृती खराब झाली, असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांना देण्यात आलेल्या लसीमुळे त्यांची प्रकृती बिघडली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
जीडीएमसीएचचे प्रमुख डॉ. आशुतोष सयाना यांनी के. के. टम्टा यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती दिली. 'टम्टा यांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे (सीएमओ) त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती दिली आहे. टम्टा यांची प्रकृती चिंताजनक नाही. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल,' असं सयाना यांनी सांगितलं.
डॉक्टरांना देण्यात आलेल्या डोजचं प्रमाण अधिक
शनिवारी कोरोना लस दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या यादीत डॉ. टम्टा यांचं नाव नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 'त्या दिवशी एक अधिकचा डोज उपलब्ध होता. तो टम्टा यांना देण्यात आला. लसीच्या एक बाटलीत ५ मिलीलीटर डोज असतो. हा डोज १० जणांना देण्यात येतो. मात्र काही बाटल्यांमध्ये ५.०५ मिलीटर डोज असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. त्याच अधिकच्या डोजमधून डॉ. टम्टा यांना लस दिली गेली,' अशी माहिती डॉक्टरांनी दिली.