उत्तराखंडात पेटलेल्या वणव्यामुळे वैष्णो देवीची यात्रा थांबवली, भाविक निराश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 11:53 AM2018-05-24T11:53:47+5:302018-05-24T12:00:29+5:30
पर्वतीय रांगा, दऱ्याखोऱ्यांतून खडतर वाट पार करत भक्तिभावानं वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांना देवीचं दर्शन न घेता माघारी फिरावं लागल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ऋषिकेश - पर्वतीय रांगा, दऱ्याखोऱ्यांतून खडतर वाट पार करत भक्तिभावानं वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवीचं दर्शन न घेताच माघारी फिरावं लागत असल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. उत्तराखंडातील जंगलांमध्ये गेल्या सात दिवसांपासून पेटलेल्या वणव्यामुळे वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. जंगलात पेटलेला वणवा मोठ्या प्रमाणात पसरत असल्यानं परिसरात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सात दिवसांपूर्वी पेटलेला वणव्याचे रौंद्र रुप पाहता परिसरात चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडातून हा वणवा आता पुढे हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या दिशेनं पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तराखंड सरकार अथक प्रयत्न करत आहे. यासाठी अधिकतर अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात येत आहे. एसडीआरएफची टीम आग आटोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. एवढे प्रयत्न सुरू असतानाही आगीवर नियंत्रण मिळण्यास मात्र अपयश येत आहे. आता शिमलाच्या आसपास परिसरातही भीषण आग पसरल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय, जम्मू परिसरातील वैष्णो देवीच्या पर्वतीय रांगांमध्ये हिमकोट आणि सांझी परिसरातील जंगलातही वणवा पसरला आहे. आगीच्या धुरांच्या लोटांमुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना श्वास घेणे कठीण होत आहे.
वाढत्या आगीचा धोका लक्षात घेता कटरापासून भवनपर्यंत वैष्णो देवीची यात्रा थांबवण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं हवाई दलाची मदत घेतली आहे. यादरम्यान, हवामान विभागानं वातावरणात भीषण उष्मा वाढण्याचाही इशारा जारी केला आहे. उन्हाळ्यांमध्ये उत्तराखंडातील जंगलांमध्ये आग लागणे, ही नवीन बाब नाही. मात्र, अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान होत आहे. शिवाय, आगीमुळे येथील नागरिक व जनावरांना आगीचा तडाखा सहन करावा लागत आहे.
Fire in a jungle #Uttarakhand's Srinagar has not been doused for 5 days. Many animals have lost lives in the fire. The fire has spread till Rishikesh-Badrinath Highway 58 pic.twitter.com/mcxt0BFAQ1
— ANI (@ANI) May 21, 2018