Uttarakhand Glacier Burst: बोगद्यात अडकलेल्यांना शोधण्यास ड्रोनचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:02 AM2021-02-11T03:02:56+5:302021-02-11T03:03:16+5:30
बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत
डेहराडून/तपोवन : उत्तराखंडमध्ये विविध सुरक्षा संस्थेचे जवान गेल्या चार दिवसांपासून बचाव कार्य करीत आहेत. तपोवन बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि दूरसंवेदी उपकरणांचा वापर केला जात आहे. या बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत.
बोगद्यात अडकलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध साधनांचा वापर केला जात आहे, असे उत्तराखंड पोलीसचे मुख्य प्रवक्ते आणि उपमहानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी घटनास्थळी सांगितले.
रविवारी हिमकडा कोसळून ऋषिगंगा आणि धौलीगंगा नदीत अचानक भीषण पूर आला. जलप्रकोपाच्या तडाख्याने ऋषिगंगा जल विद्युत प्रकल्प पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यात काम करणारे अनेक लोक अडकले होते. या भीषण आपत्तीनंतर सलग चार दिवसांपासून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. यात लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी, राज्य आपत्ती निवारण दलाचे जवळपास ६०० जवान काम करीत आहेत.
चिखल मातीचे ढिगारे सुकल्याने झाले टणक
बचाव पथके बोगद्यात ८० मीटर आत पोहोचले. अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ढिगाऱ्यांतून मार्ग काढावा लागेल. बोगद्यात साचलेले चिखल मातीचे ढिगारे सुकल्याने खूप टणक झाले आहेत. त्यामुळे ढिगारे खोदणे आणखी कठीण झाले आहे. ऋषिगंगा जल विद्युत प्रकल्पातील बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांनी बुधवारी निदर्शने केली. अधिकारी योग्यरीत्या बचाव कार्य करीत नाहीत, असा आरोप या कुटुंबीयांनी केला.