PM मोदींचे पुन्हा 'चलो केदारनाथ'; दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बाबा केदारांचं दर्शन घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:53 PM2021-11-03T12:53:58+5:302021-11-03T12:54:12+5:30
पंतप्रधा नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान केदारनाथमध्ये 700 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त येत्या 5 नोव्हेंबरला केदारनात धामचे दर्शन घेणार आहेत. पंतप्रधानांच्या केदारनाथ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान केदारनाथमध्ये सुमारे साडेतीन तास मुक्काम करतील. बाबा केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर ते आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण तसेच पुनर्निर्माण कामांची पाहणी करणार आहेत. मोदींच्या दौऱ्यामुळे रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी मनुज गोयल आणि पोलिस अधीक्षक आयुष अग्रवाल केदारनाथमध्ये तळ ठोकून आहेत.
नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत जिल्हा दंडाधिकारी मनुज गोयल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 वाजता केदारनाथ धामला पोहोचतील आणि दर्शन घेतल्यानंतरर 11 वाजता परततील. मोदींच्या दौऱ्यानिमित्त उत्तराखंड चार धाम देवस्थान व्यवस्थापन मंडळातर्फे मंदिराला फुलांनी सजवले जाणार आहे.
केदारनाथमध्ये 700 पोलिस तैनात
उत्तराखंड चार धाम देवस्थानम व्यवस्थापन मंडळ विसर्जित करण्याच्या मागणीसाठी पुजाऱ्यांनी केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. मंदिराभोवती बॅरिकेडिंगचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय चार पोलिस अधीक्षक, अकरा पोलिस उपअधीक्षक, पीएसीच्या तीन कंपन्यांसह सातशे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
केदारनाथ धाम पहिले मंदिर असेल, जिथे भोग योजनेअंतर्गत प्रसाद प्रमाणित केला जाईल. यासाठी राज्यस्तरावर प्रशिक्षण आणि लेखापरीक्षणासोबतच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे(FSSAI) प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केदारनाथ धामनंतर राज्यातील इतर मंदिरांमध्येही ही प्रक्रिया स्वीकारली जाणार आहे. अन्न सुरक्षा आयुक्त डॉ.पंकजकुमार पांडे यांनी ही माहिती दिली.