उत्तराखंडात Man vs Wild! बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी नदीत उडी, दोन रात्री काढल्या जंगलात अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 03:22 PM2021-11-22T15:22:41+5:302021-11-22T15:23:04+5:30
हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात दोन दिवस दोन रात्री काढल्या; थरारक घटनाक्रम ऐकून येईल अंगावर शहारा
देहरादून: बेयर ग्रिल्सचा मॅन व्हर्सेस वाईल्ड पाहून अनेकांची भंबेरी उडते. मात्र उत्तराखंडमधील एक घटना ऐकल्यास ग्रिल्सच्या अंगावरही शहारा येईल. एक व्यक्ती बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारतो. नदी पार करत असताना तो जंगलात पोहोचतो. हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या जंगलात तो दिन रात्री अडकून पडतो. शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची सुटका होते. विशेष म्हणजे यादरम्यान साधं खरचटतही नाही.
उत्तराखंडच्या राजाजी वनक्षेत्रात ही घटना घडली. फुगे विकणारा ३० वर्षांचा अनुराग सिंह गुरुवारी ऋषीकेशहून त्याच्या घरी बिजनौरला जात होता. रस्त्यात राजाजी व्याघ्र संरक्षण प्रकल्प येतो. तिथून संध्याकाळी जात असताना गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ त्यानं बाईक थांबवली. त्यानंतर तो सेल्फी काढू लागला. त्याचवेळी झाडीतून बिबट्यानं अनुरागवर उडी घेतली. धोका लक्षात येताच त्यानं नदीत उडी मारली.
अनुरागची सुटका करणाऱ्या पोलीस पथकातील प्रविण रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत उडी मारताच अनुरागच्या हाती एक लाकडाचा तुकडा लागला. त्याच्या आधारे तो जंगलाच्या किनाऱ्यावर पोहोचला. त्याचा फोन हरवला. पण सुदैवानं बॅग सुरक्षित राहिली. वॉटरप्रूफ बॅगमध्ये असलेल्या काडीपेटीचा अनुरागला मोठा आधार झाला.
थंडीपासून बचाव करण्यासाठी अनुरागनं शेकोटी पेटवली आणि वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी झाडावर जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी त्यानं मानवी वस्तीचा शोध सुरू केला. मात्र संपूर्ण दिवसभर पायपीट करूनही हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे दुसरी रात्रदेखील अनुरागला जंगलात काढावी लागली. शनिवारी सकाळी अनुरागनं पायपीट सुरू केली. तो हरिद्वार येथील शदाणी घाटाजवळ पोहोचला. त्यानं पुन्हा आग पेटवली. धूर पाहून कोणीतरी मदतीला येईल अशी आशा होती. पोलिसांनी आग पाहिली आणि ते अनुरागजवळ पोहोचले. त्यानंतर अनुरागची सुटका झाली.