उत्तराखंडवर मोठं संकट! ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला, १५० कामगार बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 02:49 PM2021-02-07T14:49:24+5:302021-02-07T15:20:10+5:30
Uttarakhand Glacier Break : उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात खूप मोठं नुकसान आणि जीवीतहानी झाल्याची माहिती आता समोर
उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात खूप मोठं नुकसान आणि जीवीतहानी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये जोशीमठ येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला असून या प्रकल्पासाठी काम करत असलेले १०० ते १५० कामगार बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. (Uttarakhand Power Plant Damaged After Glacier Break, Many Feared Stuck)
महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळतानाची भयावह दृश्य पाहा
उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. या पुरात नदी जवळच्या गावांना मोठा फटका बसला असून अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाजवळचा बांध फुटल्यानं नदी लगतच्या गावांमध्येही पाणी शिरलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत घटनास्थळी निघाले असून आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमही रवाना करण्यात आल्या आहेत.
अमित शहांनी दिलं मदतीचं आश्वासन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची दखल घेतली असून आवश्यक अशी सर्व मदत केंद्र सरकार करणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री रावत यांच्याशी बोलणं झालं असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही ते म्हणाले. देवभूमीतील लोकांना वाचवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचं शहा म्हणाले.
उत्तराखंड सरकारकडून हेल्पलाइन नंबर जारी
उत्तराखंडमधील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. 1070 आणि 9557444486 हे हेल्पलाइन क्रमांक आहेत. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 9557444486 हा हेल्पालाईन नंबर जारी करण्यात आला आहे.