उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात,  घसरले 4 डबे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 08:48 PM2017-09-02T20:48:28+5:302017-09-02T21:51:09+5:30

अलाहाबादहून वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे

UttarPradesh : 4 loaded wagons of a goods train derailed near Hardattpur railway station | उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात,  घसरले 4 डबे 

उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात,  घसरले 4 डबे 

Next

लखनौ, दि. 2 - अलाहाबादहून वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाराणसीजवळ असलेल्या हरदत्तपूर रेल्वे स्टेशन परिसरात या मालगाडीचे चार डबे घसरले. या अपघातानंतर वाराणसी-अलाहाबाद मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला आहे. यामुळे अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.  या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

उत्कल एक्स्प्रेस अपघातात 23 जणांचा मृत्यू 

उत्तर प्रदेशात 19 ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून 23 जणांचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर, पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात 70 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे. स्वत: सुरेश प्रभू यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा सादर केला आहे.

दरम्यान, उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी 13 रेल्वे कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ४0 हून अधिक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेला कनिष्ठ अभियंता आणि हॅमरमॅन यांच्यासहित 11 कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता अपघात झाला त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करत होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी अनधिकृतपणे देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरु होती. 'इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी रेल्वे कर्मचा-यांचं निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ आहे', अशी माहिती रेल्वे अधिका-याने दिली आहे.  निलंबनाची कारवाई सेक्शन 14 (II) च्या अंतर्गत करण्यात आली आहे. यानुसार कर्मचा-यांनी हलगर्जीपणा केला असल्यास तपास सुरु असतानाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अपील करण्यासाठी कर्मचा-यांकडे 45 दिवसांचा कालावधी आहे. 

उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी रेल्वेने दिल्ली विभागातील चार रेल्वे अधिका-यांना निलंबित केलं आहे. यामध्ये एक वरिष्ठ विभागीय अभियंत्याचा समावेश होता. तपास कर्मचा-यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.  दरम्यान, दुसरीकडे चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे


Web Title: UttarPradesh : 4 loaded wagons of a goods train derailed near Hardattpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात