'आता शर्टवरही नावं लिहायची का?", युपीतील 'नेमप्लेट' वादावर NDA तील घटक पक्षांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 02:02 PM2024-07-21T14:02:03+5:302024-07-21T14:03:12+5:30
केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी या आदेशावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Uttar Pradesh BJP : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने (Yogi Adityanath) कांवड यात्रेच्या (Kanwar Yatra) मार्गांवरील सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकनावर स्वतःचे नाव लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांसोबतच NDA तील मित्रपक्षांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. JDU आणि LJP नंतर आता राष्ट्रीय लोकदलानेही (RLD) या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
आरएलडी प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी मीडियाशी संवाद साधताना या आदेशावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आता कुठं-कुठं नावं लिहावीत? आता काय आपल्या शर्टवरही नावं लिहायची का? कांवड प्रवाशांची सेवा सर्व जाती-धर्मातील लोक करतात. कांवड यात्रा घेऊन जाणारेही कोणत्या व्यक्तीला त्याची ओळख विचारत नाहीत. हा मुद्दा धर्माशी जोडला जाऊ नये. राज्यातील भाजप सरकारने फार विचार करुन आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे आता सरकार काय निर्ण घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे. सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे," अशी प्रतिक्रिया जयंत चौधरी यांनी दिली.
काय आहे योगी सरकारचा आदेश?
योगी सरकारने कांवड मार्गावरील सर्व दुकानदारांना आपल्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहिण्याचा आदेश जारी केला आहे. आपण कोणाच्या दुकानातून माल घेत आहोत, हे कांवड यात्रेकरुंना कळावे, हा यामागाच उद्देश आहे. सीएमओच्या म्हणण्यानुसार, कांवड यात्रेकरुंच्या श्रद्धेची शुद्धता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या आदेशानंतर कांवड मार्गावरील सर्व दुकानांवर मालकाची नावे दिसत आहे. पण, आता या निर्णयामुळे राज्यातील हिंदू-मुस्लिम राजकारण तापले आहे. विरोधक हा निर्णय राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत.