व्ही. के. सिंह यांनी केली छळवणूक
By admin | Published: August 19, 2016 01:05 AM2016-08-19T01:05:41+5:302016-08-19T01:05:41+5:30
लष्करातील तत्कालीन जनरल व्ही. के. सिंह यांनी आपल्याला अनेक प्रकारे त्रास दिला, बढती रोखली, आपल्यावर बेकायदा प्रतिबंध आणले, असे गंभीर आरोप लष्कर प्रमुख दलबीर सिंह
नवी दिल्ली : लष्करातील तत्कालीन जनरल व्ही. के. सिंह यांनी आपल्याला अनेक प्रकारे त्रास दिला, बढती रोखली, आपल्यावर बेकायदा प्रतिबंध आणले, असे गंभीर आरोप लष्कर प्रमुख दलबीर सिंह यांनी केले आहेत. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दिले आहे.
सध्या केंद्रात मंत्री असलेले व तत्कालिन जनरल व्ही.के. सिंह यांनी खोटे, निराधार आणि काल्पनिक आरोप करत आपल्याला त्रास दिल्याचे दलबीर सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आपणाला १९ मे २०१२ रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आणि आपल्यावर प्रतिबंध आणण्यात आले. आसाममधील जोरहाट येथील २०११ च्या एका आॅपरेशनमध्ये असफल झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. आर्मी कमांडरच्या पदोन्नतीतही आपल्याबाबत पक्षपाती धोरण अवलंबण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले आहे.
व्ही. के. सिंह ३१ मे २०१२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर जनरल विक्रम सिंह यांची नियुक्ती झाली व जूनमध्येच आपल्यावरील हे प्रतिबंध हटविण्यात आले. त्यानंतर आपली पूर्व भागात कमांडरपदी नियुक्ती झाली, असेही दलबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. व्ही. के. सिंह हे यापूर्वीही निवृत्तीच्या तारखेवरुन चर्चेत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)