व्ही. के. सिंग यांचा पुन्हा ‘टिष्ट्वट’वाद
By admin | Published: April 9, 2015 12:48 AM2015-04-09T00:48:54+5:302015-04-09T00:48:54+5:30
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी थेट प्रसारमाध्यमांवरच गरळ ओकली आहे.
नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी थेट प्रसारमाध्यमांवरच गरळ ओकली आहे. ‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या प्रेस्टिट्यूटकडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’असे टिष्ट्वट त्यांनी केले आहे.
प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला आहे.
अलीकडच्या काळात व्ही. के. सिंग व वाद हे समीकरणच झाले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान दिनानिमित्त पाक दूतावासात झालेल्या समारंभाला सिंग उपस्थित होते. त्यानंतर नाइलाजास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले असे टिष्ट्वट त्यांनी केले. त्यांच्या या टिष्ट्वटवरून मोठे वादळ निर्माण झाले होते. त्यांच्या या टिष्ट्वटची माध्यमांमध्येही खरपूस चर्चा झाली. हे वादळ शमत नाही तोच माजी लष्करप्रमुख असलेले सिंग यांनी आणखी एक वाद उभा केला.
सध्या ते युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेत व्यग्र आहेत. त्यासाठी ते जिबोती येथे तळ ठोकून आहेत. यावेळी झालेल्या पत्रपरिषदेत त्यांनी पाक दूतावासातील कार्यक्रम व येमेन मोहिमेची फारच विचित्र तुलना केली. दूतावासाच्या भेटीसारखा थरार येमेन मोहिमेत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली. सिंग यांना ती फारच झोंबली व त्यांनी पुन्हा एकदा टिष्ट्वटरवरून माध्यमांवर हल्ला चढविला आणि माध्यमांना चक्क ‘प्रेस्टिट्यूट’ संबोधून अपमान केला. वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकणारे सिंग माध्यमांवर जाम नाराज आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)