व्ही. के. सिंह यांच्या पत्नीला धमकी
By admin | Published: August 18, 2016 05:48 AM2016-08-18T05:48:56+5:302016-08-18T05:48:56+5:30
एक आॅडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याची धमकी देत एक व्यक्ती आपल्याला दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह
नवी दिल्ली : एक आॅडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्याची धमकी देत एक व्यक्ती आपल्याला दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांच्या पत्नी भारती सिंह यांनी केली आहे. या प्रकरणी प्रदीप चौहान या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आली नाही.
भारती सिंह यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे की, छेडछाड करण्यात आलेल्या एका आॅडिओ - व्हिडिओ क्लिपच्या आधारावर आपल्या पतीला बदनाम करण्याची धमकी हा व्यक्ती देत आहे. प्रदीप चौहान नावाचा हा व्यक्ती दोन कोटी रुपयांची मागणी करत असून जर पैसे दिले नाही तर याचे गंभीर परिणाम होतील, असेही तो सांगत आहे. या व्यक्तीने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांचे पती आणि कुटुंबाविरुद्ध खोटे आरोप केले होते. या प्रकरणी तुगलक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौहान हा गुडगावचा रहिवासी आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत. आरोपीची चौकशीही केली. या आरोपीला पुन्हा बोलाविण्यात येणार आहे. या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. बळजबरीने वसुली करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोण आहे आरोपी?
भारती सिंह यांनी सांगितले की, हा आरोपी आपल्या पुतण्याचा मित्र आहे. गत काही दिवसांपासून तो आपल्याला फोन करत आहे आणि हे आॅडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी तो देत आहे.
तथापि, या क्लिपमध्ये नेमके काय आहे? याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. ६ आॅगस्ट रोजी रात्री तर या आरोपीने वारंवार फोन करुन तुमच्या पतीची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याची धमकी दिली.