एका दिवसात 15 लाख लोकांना लस, १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:14 AM2021-03-07T06:14:31+5:302021-03-07T06:15:19+5:30
१८ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १ लाख ८० हजार रुग्णांवर उपचार सुरू, बरे झालेल्यांचे प्रमाण ९७.९८%
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी कोरोनाचे १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. सलग चार दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून, तो आकडा १ लाख ८० हजारांवर पोहोचला आहे. मात्र बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढून ते ९७.९८ टक्के झाले. देशात शुक्रवारी सुमारे १५ लाख लोकांना लस देण्यात आली.
गेल्या २९ जानेवारी रोजी १८,८५५ नवे रुग्ण आढळले होते. त्यापेक्षा शनिवारचा आकडा पाचशेने कमी आहे. कोरोनामुळे शनिवारी आणखी १०८ जण मरण पावले असून, बळींची संख्या १ लाख ५७ हजारपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे १ कोटी ११ लाख ९२ हजार रुग्ण असून, त्यातील १ कोटी ८ लाख ५४ हजार जण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४१ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण वाढून १.६१ टक्के झाले आहे.
महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला. महाराष्ट्रात कोरोना साथीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर असल्याने हा निर्णय घेतल्याचे मध्य प्रदेश सरकारच्या सूत्रांनी सांगितले.
बहुस्तरीय मास्क संसर्ग रोखण्यात अधिक प्रभावी
n बहुस्तरीय मास्क हे हवेतून जंतूंचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी अधिक प्रभावी असतात, असे बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी केलेल्या एका पाहणीत आढळून आले.
n या पाहणीमध्ये अमेरिकेच्या दोन शिक्षण संस्थाही सामील झाल्या होत्या. कोरोना विषाणूंचे नवीन प्रकार आढळून आले असून, त्यांची संसर्गशक्ती अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
१ कोटी ९४ लाख लोकांना कोरोना लस
देशात शुक्रवारी सुमारे १५ लाख लोकांना लस देण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेतील एका दिवसात लस दिलेल्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे.
आजवर १ कोटी ९४ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला होता.