Corona Vaccination: बच्चेकंपनीचे लसीकरण जोरात; १ लाख ७४ हजार मुलांचे एका दिवसात लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:59 AM2022-01-04T06:59:40+5:302022-01-04T06:59:59+5:30
Corona Vaccination drive 15 to 18 age: १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/मुंबई : ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४० लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली. राज्यात १ लाख ८० हजार मुलांना लस देण्यात आली.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. १२ वर्षे वयावरील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यासाठी औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २४ डिसेंबर रोजी सशर्त परवानगी दिली होती. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे १० कोटी मुले आहेत.
पहिल्या दिवशी लसीकरणात राज्यात प्रथम क्रमांकावर सांगली (९.३ टक्के), तर दुसऱ्या क्रमांकावर धुळे (७.२ टक्के) जिल्हा राहिला. त्यानंतर तिसरा क्रमांक (६.३ टक्के) अहमदनगर जिल्ह्याचा राहिला.
नाशकात कोव्हॅक्सिनऐवजी कोविशिल्ड
n पाटोदा येथील आरोग्य केंद्रात अथर्व पवार या १६ वर्षीय मुलास कोव्हॅक्सिनऐवजी कोविशिल्डची लस टोचण्यात आली. पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार केली. तेव्हा अनावधानाने सेविकेकडून ही चूक झाल्याचे अधिकाऱ्याने मान्य केले.
औरंगाबाद, जालना
औरंगाबादमध्ये सहा केंद्रांवर १ हजार ६८ जणांना लस देण्यात आली. या योजनेचा प्रारंभ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. तर जालन्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
नागपूर
नागपूर शहरात ८,०३९ तर ग्रामीणमधील ६,६१५ असे एकूण १३,४५३ मुला-मुलींनी लस घेतली. शहरात मनपातर्फे २० स्थायी व ३३ शाळा-महाविद्यालयांमध्ये तर ग्रामीणमध्ये ५३ व १२ ग्रामीण रुग्णालयांमधील असे एकूण ११८ केंद्रांवर विशेष नियोजन करण्यात आले होते.