लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:10 AM2021-06-27T06:10:43+5:302021-06-27T06:11:08+5:30
संसदेत प्रवेश करण्यासाठी कोरोना लस बंधनकारक
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेच्या ९३ टक्के सदस्यांनी तर लोकसभेच्या ८० टक्के सदस्यांनी कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लस घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्यसभेतील २३६ सदस्यांपैकी २१४ सदस्यांनी लस घेतली आहे. पाच जण कोरोना संसर्गातून बरे होत आहेत. १७९ सदस्यांचे दोन्ही डोस झाले आहेत. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४५ असून ९ जागा रिक्त आहेत.
लोकसभेतील ५४२ पैकी ४१० पेक्षा अधिक सदस्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सुमारे डझनभर सदस्यांचा मात्र एकच डोस झालेला आहे. तीन जागा रिक्त आहेत. कोविड-१९ संसर्गामुळे सुमारे डझनभर खासदारांना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी, राहुल गांधी आणि काही मंत्री यांचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत सुमारे ५० खासदारांना कोविड-१९ चा संसर्ग झाला असून रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह तीन खासदारांचा त्यात मृत्यू झाला आहे.
अधिवेशनापूर्वी पूर्ण करणार लसीकरण
n सूत्रांनी सांगितले की, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला हे खासदारांच्या लसीकरणावर लक्ष ठेवून आहेत. जुलै अखेरीस सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लसीकरण पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
n संसदेच्या ९० टक्के प्रशासकीय व सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही लस घेतली आहे. खासदार, कर्मचारी आणि पत्रकार अशा सर्वांनाच लस घेतल्याशिवाय संसद भवनात प्रवेश दिला जाणार नाही.
n कोविड-१९ साथीमुळे २०२० चे हिवाळी अधिवेशन रद्द करावे लागले होते. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला होता.