१६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 06:44 AM2021-01-10T06:44:05+5:302021-01-10T06:44:28+5:30
केंद्राचा निर्णय; ३० कोटी लोकांना लस
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला.
कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे. लसीकरण मोहिमेत सध्या ३० कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यातील ३ कोटी लोकांना
प्राधान्याने लस देण्यात येणार असून त्यात डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील तसेच पालिका कर्मचारी, लष्करी जवान, पोलीस आदी कोरोना योद््ध्यांचा समावेश होतो. उर्वरित २७ कोटी लोकांमध्ये ५० वर्षांपुढील व्यक्ती व ज्यांना एकाहून अधिक व्याधी आहेत अशा ५० वर्षांखालील व्यक्तींनाही ही लस दिली जाईल. कोरोना लसीचा पुरवठा व वितरण, साठवणुकीसाठीही केंद्र सरकारने जय्यत पूर्वतयारी केली आहे. देशात लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, माघ बिहू असे सण येत्या काही दिवसांत साजरे होणार आहेत. त्यानंतर लगेचच कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात होईल.
को-विन अॅपचे कामकाज नेमके कसे चालणार याची सविस्तर माहिती पंतप्रधानांनी कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीत शनिवारी घेतली. या अॅपमध्ये आतापर्यंत ७९ लाख लोकांनी नावनोंदणी केली आहे. या लसीकरण मोहिमेचे आतापर्यंत विविध स्तरातील ६ लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना लसीकरणाच्या पुरवठा व वितरणासाठी पुणे हे सर्वात महत्वाचे केंद्र असणार आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यानंतर भारत व ब्राझिल या देशांचा क्रमांक लागतो.
असा होणार पुरवठा
n लसीच्या पुरवठ्यासाठी पुणे हे सर्वात महत्त्वाचे केंद्र असेल. तिथून देशातील ४१ केंद्रांना लस पुरविली जाईल. या केंद्रांत कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आदी शहरांचा समावेश आहे.
n यासाठी देशात सुमारे ३० हजारांहून अधिक केंद्रे सुरू केली जातील असा अंदाज आहे.
लसींची उपलब्धता
n कोविशिल्ड लसीचे ५ कोटी डोस सीरमने बनविले आहेत. येत्या जुलै महिन्यापर्यंत ५० कोटी डोस बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
n कोवॅक्सिन या लसीचे भारत बायोटेक कंपनीने सध्या १ कोटी डोस बनविले आहेत.
सहा महिन्यांत मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष्य
n सुमारे ३० कोटी लोकांना सहा महिन्यांत लस देण्याचे उद्दिष्ट केंद्राने समोर ठेवले आहे. पण इतक्या कमी कालावधीत प्रत्येकाला दोन डोस देऊन मोहीम पूर्ण होणे अशक्य आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
भारताकडे लागले साऱ्या जगाचे लक्ष : मोदी
मानवजातीला वाचविण्यासाठी भारतामध्ये बनविलेल्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी आमच्या सरकारने मंजुरी दिली आहे. जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारत कशा पद्धतीने राबवितो याकडे साºया जगाचे लक्ष लागले आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान