लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:04 AM2022-01-17T06:04:40+5:302022-01-17T06:05:03+5:30
अनेकांचे प्राण, रोजीरोटीचे झाले रक्षण
नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेमुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली. त्यामुळे अनेकांचे प्राण व रोजीरोटी यांचे रक्षण झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी यांनी हे वक्तव्य केले.
भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेने कहर केल्यानंतर गेल्या वर्षी १६ जानेवारीला जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना साथीची सुरुवात झाली, तेव्हा या आजाराविषयी कोणालाच फारसे माहीत नव्हते. मात्र देशातील शास्त्रज्ञांनी त्यानंतर काही महिन्यांतच कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. या लसींमुळे कोरोना साथीविरोधात मुकाबला करण्याची देशाची ताकद वाढली आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी वंदन करतो. सर्व डाॅक्टर, नर्स, आरोग्यसेवक यांनी लसीकरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आरोग्यसेवक दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना लस देत आहेत. अशा गोष्टींनीच ही मोहीम यशस्वी झाली. कोरोना साथीच्या काळात देशातील आरोग्ययंत्रणा आणखी सुसज्ज करण्यात आली.
७० टक्के लोकांना दिले दोन्ही डोस
पात्र गटांतील ७० टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले तर ९१ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीवर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे मांडवीय यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.