लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:54 IST2021-07-02T16:51:59+5:302021-07-02T16:54:02+5:30
लसीकरण केंद्रावर लस नसल्यानं नगरसेवक परतला; मोबाईलवर लस मिळाल्याचा मेसेज आला

लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरण मोहीम वेगानं राबवण्याची गरज आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा पुरेसा साठा नसल्यानं लसीकरण अभियानात अडथळे येत आहेत. गाझियाबाद महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक देवेंदर भारती यांच्यासोबत एक अजब प्रकार घडला आहे.
देवेंद्र भारती कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेण्यासाठी २४ जूनला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि पत्नी होती. भारती यांच्या पत्नीला डोस मिळाला. मात्र देवेंदर आणि त्यांच्या मुलाला डोस मिळाला नाही. लसींचा साठा कमी असल्यानं देवेंदर आणि त्यांच्या मुलाची निराशा झाली. मात्र २८ जूनला त्यांना लसीकरण झाल्याचा मेसेज आला. त्यांनी आरोग्य सेतू ऍप तपासून पाहिलं. त्यावर त्यांना त्यांचं आणि मुलाचं लसीकरण प्रमाणपत्रदेखील दिसलं. लस टोचली गेली नसताना लसीकरण प्रमाणपत्र आल्यानं देवेंदर यांना धक्काच बसला. देवेंदर यांनी नगरपालिकेच्या आयुक्तांकडे स्वत:ची व्यथा मांडली.
'आरोग्य सेतूवर माझं आणि माझ्या मुलाचं लसीकरण प्रमाणपत्र आलं आहे. आम्हाला लसच दिली गेली नसताना प्रमाणपत्र आलं आहे. सीएमओमधील कोणीच फोन घेत नाही. आता मी कुठे जाऊ? माझ्या नावानं लसीकरण तर झालेलं आहे,' असं भारती यांनी सांगितलं. मेरठमध्ये राहणाऱ्या दीपक यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. दीपक यांनी त्यांच्या वयोवृद्ध आईसाठी मेरठमध्ये स्लॉट बुक केला होता. ताप आल्यानं दीपक यांच्या आई लसीकरणासाठी गेल्या नाहीत. मात्र दुसऱ्या दिवशी दीपक यांना आईचं लसीकरण झाल्याचा मेसेज आला. आता दीपक तक्रार करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.