आनंदाची बातमी! कोरोना लस घेतल्यावर डेल्टा व्हेरिअंटमुळे होणाऱ्या मृत्यूपासून ९९% संरक्षण, NIV चा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 03:30 PM2021-07-17T15:30:04+5:302021-07-17T15:31:28+5:30
कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिअंटची लागण रुग्णाला झाली तरी अशा रुग्णाला मृत्यूपासून ९९ टक्के संरक्षण प्राप्त होतं
कोरोना विरोधी लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण कशी होते याचा अभ्यास पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे (NIV) शास्त्रज्ञ करत आहेत. यासाठी अनेक नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा समावेश होता. यासोबत अल्फा, कप्पा, डेल्टा एवाय वन (डेल्टा प्लस) आणि डेल्टा एवाय २ यांचाही समावेश होता. (Vaccine offers 99% protection against death in Delta strain, finds NIV study)
"सध्याच्या घडीला डेल्टा व्हेरिअंटमुळे संपूर्ण जगभरात कोरोनाची लाट निर्माण झाली असली तरी एक महत्वाची माहिती अभ्यासातून समोर आली आहे ती म्हणजे कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिअंटची लागण रुग्णाला झाली तरी अशा रुग्णाला मृत्यूपासून ९९ टक्के संरक्षण प्राप्त होतं", असं डॉ. यादव म्हणाले.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून गोळा करण्यात आलेल्या एकूण ५३ नमुन्यांची चाचणी मार्च आणि जून महिन्यात करण्यात आली. तर कर्नाटकातून १८१ आणि पश्चिम बंगालमधून सर्वात कमी १० नमुन्यांचा अभ्यास यावेळी करण्यात आला.
"अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतही डेल्टा व्हेरिअंटची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ ९.८ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. तर मृत्यूचा दर अवघा ०.४ टक्के आढळून आला आहे. यातून कोरोना विरोधी लसीकरण रुग्णाला हॉस्पीटलमध्ये जाण्यापासून आणि मृत्यू होण्यापासून रोखण्यात अतिशय महत्वाचं असल्याचं स्पष्ट दिसून येतं", असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अभ्यासात बहुतांश तरुण रुग्णांचा समावेश होता. वयवर्ष ३१ ते ५६ मधील रुग्णांचे नमुने यात तपासण्यात आले. यात ४४ हे सरासरी वय होतं. यात ६५.१ टक्के पुरूषांचा समावेश होता आणि त्यातील ७१ टक्के रुग्णांना एक आणि त्यापेक्षा अधिक लक्षणं आढळून आली. यात ताप (६९ टक्के), अंग दुखणं, मळमळ, खोकला आणि घसा खवखवणे या लक्षणांचा समावेश आहे.
कोरोना विरोधी लस घेतल्यानंतर जरी कोरोनाची लागण झालेली पाहायला मिळालं असलं तरी यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी आहे, असं ब्रिटन, इस्राइल आणि कॅनडामध्येही दिसून आलं आहे.
कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिअंटची लागण झालेल्या रुग्णांच्या परिस्थितीवर एनआयव्हीचे शास्त्रज्ञ सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. "लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केल्यानं उपलब्ध लसींच्या उपयुक्ततेबाबत आणि नव्या लसीच्या निर्मितीसाठीच्या अभ्यासाठी खूप मदत होऊ शकते", असंही डॉ. यादव म्हणाले.