लस संशाेधक, उत्पादक हॅकर्सच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 06:00 AM2021-02-28T06:00:00+5:302021-02-28T06:00:33+5:30
चिनी आणि रशियन हॅकर्सचे प्रयत्न, ‘सीरम’सह ‘भारत बायाेटेक’ आणि ‘पतंजली’ही निशाण्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेनाविरुद्धच्या लढ्यात लसनिर्मितीच्या बाबतीत भारत खूप माेठी भूमिका पार पाडताना दिसत आहे. जगभरात लस पुरवठ्यामध्ये भारताचे पुढे पडत असलेले पाऊल ड्रॅगनच्या डाेळ्यात खुपत आहे. त्यामुळेच चिनी हॅकर्सने भारतातील काेराेना लस संशाेधक, उत्पादक आणि प्रशासकांकडे माेर्चा वळविला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायाेटेक, पतांजली आणि एम्स या संस्था चिनी आणि रशियन हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.
सद्यस्थितीत हॅकिंगच्या १५ माेहिमा कार्यरत आहेत. काेराेना लस संशाेधनाची माहिती, चाचणी अहवाल, लस पुरवठा तसेच रुग्णांची माहिती चाेरण्यासाठी हॅकर्सचे जाेरदार प्रयत्न सुरू आहेत. चीन आणि रशियासाेबतच उत्तर काेरियातूनही हॅकिंगचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील सात प्रमुख कंपन्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. रशियाचे स्ट्राॅन्टीयम आणि फॅन्सी बेअर, उत्तर काेरियाचे झिंक आणि सिरियम हे हॅकर्सचे ग्रुप यामध्ये सहभागी असल्याची माहिती आहे.
असा हाेता प्रयत्न
‘ॲस्ट्राझेनेका’मध्ये काेराेना लसीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाेकरीसंदर्भातील खाेट्या ऑफर्सचे ई-मेल पाठविण्यात आले हाेते. त्यात एक हॅकिंग काेड असलेली लिंक हाेती, अशी माहिती समाेर आली आहे. सर्व ई-मेल रशियातून पाठविण्यात आले हाेते.
हे देश रडारवर
भारतासाेबतच जपान, अमेरिका, कॅनडा, दक्षिण काेरिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली , फ्रान्स आणि जर्मनीसह एकूण १२ देश हॅकर्सच्या रडारवर आहेत.