नव्या काेराेनावरही लस प्रभावी ठरेल, शास्त्रज्ञांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 06:13 AM2020-12-23T06:13:37+5:302020-12-23T06:14:08+5:30
'The vaccine will also be effective against new carona Virus' : भारतात नव्या प्रकारच्या काेराेनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या अधिक काळजीपूर्वक कराव्या लागतील, असे ‘एम्स’चे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
नवी दिल्ली : ब्रिटनसह काही देशांमध्ये काेराेनाच्या विषाणूचे नवे स्वरूप आढळल्यानंतर, जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, परंतु घाबरण्याचे काेणतेही कारण नसून, काेविड १९ वर शाेधण्यात आलेली लस नव्या स्वरूपावरही प्रभावी ठरेल, असा विश्वास विविध शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारतात नव्या प्रकारच्या काेराेनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या अधिक काळजीपूर्वक कराव्या लागतील, असे ‘एम्स’चे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. ते म्हणाले, यापुढे चाचण्या करताना जनुकीय अनुक्रमणही तपासावे लागणार आहे. ज्यांच्यात हा विषाणू आढळला, त्याचे विलगीकरण करून अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. ब्रिटनमध्ये नव्या विषाणूमुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे, परंतु रुग्णांची प्रकृती गंभीर झालेली नाही, असे गुलेरिया म्हणाले.
बाेरीस जाॅन्सन यांचा भारत दौरा रद्द?
ब्रिटनचे पंतप्रधान बाेरीस जाॅन्सन यांचा भारत दौरा रद्द हाेण्याची शक्यता आहे. काेराेनाच्या नव्या स्ट्रेनमुळे त्यांची भारत भेट शक्य नसल्याचे सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले हाेते.
ब्रिटनमधून आलेले २२ पाॅझिटिव्ह
ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत २२ प्रवासी काेराेना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. निर्बंध लागू हाेण्यापूर्वी एअर इंडियाची दाेन विमाने भारताकडे निघाली हाेती. मध्यरात्रीच्या सुमारास विमानांचे लँडिंग झाले.
काेलकाता येथे दाेन प्रवाशांना काेराेना झाल्याचे निदान करण्यात आले आहे. गुजरातमध्येही ब्रिटनमधून आलेल्या सहा प्रवाशांना काेराेना झाला आहे. पंजाबमध्ये ब्रिटन येथून आलेले ८ जण पाॅझिटिव्ह आढळले.
बायडेन यांनी घेतली लस
अमेरिकेचे नियाेजित राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी ‘फायझर’च्या लसीची पहिली मात्रा घेतली. त्यांनी लस घेतानाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
सात हजार प्रवासी दिल्लीत दाखल
दिल्लीमध्ये गेल्या दाेन आठवड्यांमध्ये सुमारे ७ हजार प्रवासी ब्रिटनमधून दाखल झाले आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार खडबडून जागे झाले आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.
ब्रिटन येथून औरंगाबादमध्ये ९ आले
औरंगाबाद शहरात ब्रिटन येथून एकूण ९ नागरिक दाखल झाले. ७ जण शहरात वास्तव्याला आहेत. महापालिकेने मंगळवारी सातही नागरिकांची कोरोना तपासणी केली.
लसनिर्मितीवर परिणाम नाही
ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणू अद्याप भारतात आढळलेला नाही. नव्या विषाणूचा सध्या विकसित करण्यात येत असलेल्या लसींवर परिणाम हाेणार नाही. संसर्ग वाढताेय, परंतु त्याने गंभीर आजार हाेत नाही. - डाॅ. व्ही. के. पाॅल, सदस्य, निती आयाेग
नवा स्ट्रेन प्राणघातक नाही
काेराेना विषाणूचा नवा प्रकार प्राणघातक नाही. विषाणूचा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य असून त्यावर काेराेनावरील लस परिणामकारक ठरणार नाहीत, असे कुठलेही पुरावे सध्या तरी नाहीत. मात्र, नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी. - डाॅ. विवेक मूर्ती, महाशल्यचिकित्सक
घाबरण्याचे कारण नाही
नव्या प्रकारचा विषाणू खूप वेगाने पसरताे. मात्र, असे नाही की, ताे खूप जास्त धाेकादायक आहे आणि लाेकांचा मृत्यू हाेईल. नव्या विषाणूमुळे अँटिबाॅडींमध्ये, इतर रचनेमध्ये थाेडा फरक राहू शकताे. त्याच्याविरुद्ध लस निष्प्रभ ठरेल असे नाही.
- डाॅ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर