रेल्वेत दिसणार व्हॅक्यूम टॉयलेट
By Admin | Published: February 2, 2015 04:07 AM2015-02-02T04:07:01+5:302015-02-02T04:07:01+5:30
रेल्वेतील सध्याच्या शौचालयांच्या आकारात बदल करण्यासह पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल ‘व्हॅक्यूम टॉयलेट’
नवी दिल्ली : रेल्वेतील सध्याच्या शौचालयांच्या आकारात बदल करण्यासह पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल ‘व्हॅक्यूम टॉयलेट’ लावण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या येत्या अर्थसंकल्पात आणला जाऊ शकतो.
व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये विष्ठा हवेद्वारे ओढली जात असल्याने पाण्याचा कमीतकमी वापर केला जातो. २०१५-१६ या वर्षासाठी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठोस योजना आणली जाईल. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे वाहतूक पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी योजनांना वेग दिला असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देशभरातील रेल्वे यंत्रणेत पाण्याचे आॅडिट करण्याच्या व्यापक योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये सध्याच्या शौचालयांच्या तुुलनेत एकचतुर्थांश पाणी कमी लागते. काही निवडक गाड्यांमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. चंदीगड शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक स्तरावर ८० व्हॅक्यूम टॉयलेट लावण्याची योजना आहे. प्रभू हे आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करू शकतात. पर्यावरणाला अनुकूल शौचालयांमुळे रेल्वेच्या रुळाची झीज होण्याचे प्रमाण कमी होईल. व्हॅक्यूम टॉयलेटची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरी प्रशासनाचे सहकार्य आवश्यक राहील.