Vadodara Violence: गुजरातच्या वडोदरामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:02 AM2022-04-18T11:02:41+5:302022-04-18T11:05:05+5:30
Clash In Vadodara: दोन गटात झालेल्या हाणामारीत 4 जण जखमी झाले असून, पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
वडोदरा: गुजरातमधीलवडोदरा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जण जखमी झाले आहेत. या गोंधळादरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यात 10 हून अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रावपुरा आणि ढिकटा भागात पोलीस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या वडोदरातील रावपुरा आणि ढिकाटा भागात पोलीस दल तैनात आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांनी आवाहन
हिंसाचारावर पोलीस अधिकारी म्हणाले की, सध्या परिसरात शांततेचे वातावरण आहे. शहरातील सर्व संवेदनशील भागात पोलिसांची गस्त सुरू आहे. अधिक पोलिस पथकांना पाचारण करण्यात आले आहे. यावेली पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनदेखील केले.