अचूक टायमिंग; YES बँकेवर निर्बंध घालण्यापूर्वीच गुजरातच्या कंपनीनं काढले २६५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 09:42 AM2020-03-07T09:42:29+5:302020-03-07T09:54:18+5:30
आरबीआयनं निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच कंपनीनं काढले २६५ कोटी
नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेधारक अडचणीत सापडले आहेत. येस बँकचे ग्राहक प्रति महिना ५० हजार रुपयेच काढू शकतात. रिझर्व्ह बँकेनं घातलेल्या निर्बंधांमुळे खातेधारकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुजरातमधल्या एका कंपनीनं मात्र रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लागू करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी येस बँकेतून २६५ कोटी रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीनं साधलेल्या टायमिंगकडे संशयानं पाहिलं जात आहे.
बडोदा पालिकेनं स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटनं येस बँकेवर निर्बंध लादले जाण्यापूर्वी २६५ कोटी रुपये काढले. ही रक्कम केंद्राकडून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बडोदा महापालिकेचे उपआयुक्त सुधीर पटेल यांनी दिली. 'केंद्रानं स्मार्ट प्रकल्पासाठी अनुदान दिलं. ती रक्कम आम्ही येस बँकेच्या स्थानिक शाखेत जमा केली होती. मात्र बँकेसमोर आर्थिक समस्या असल्याचं लक्षात येताच आम्ही तो निधी बँक ऑफ बडोदात जमा केला,' असं पटेल यांनी सांगितलं.
आंध्र प्रदेशातल्या तिरुमला तिरुपती देवस्थानानंसुद्धा काही दिवसांपूर्वीच येस बँकेतून मोठी रक्कम काढली होती. तिरुपती देवस्थानानं येस बँकेतून १३०० कोटी रुपये काढले होते. ऑक्टोबरमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली होती. त्यामध्ये येस बँकेत जमा असलेली रक्कम इतरत्र गुंतवण्याचा निर्णय झाला. तिरुमला तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी काही बँकांच्या ताळेबंदांचा अहवाल पाहून त्यातले धोका लक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांनी येस बँकेतली रक्कम काढण्याचा निर्णय घेतला.