प्रेरणादायी! 8 वेळा अपयश येऊनही हार नाही मानली; अपघातातून सावरत 'त्याने' UPSC क्रॅक केली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:12 PM2022-08-23T13:12:39+5:302022-08-23T13:13:49+5:30
Vaibhav Chhabra : यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्याने हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आणि अखेर यश प्राप्त केलं आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यावर अनेक जण पुन्हा अभ्यास करणं सोडून देतात. पण काही जण हार न मानता पुन्हा दुप्पट मेहनत घेऊन घवघवीत यश मिळवतात. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं आहे. यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्याने हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आणि अखेर यश प्राप्त केलं आहे. वैभव छाबडा (Vaibhav Chhabada) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
वैभव छाबडा यांना या यूपीएससी परीक्षेत तब्बल आठ वेळा अपयश आलं पण त्यांनी हिंमतीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर 2018 मध्ये या परीक्षेत 32 वा क्रमांक मिळवला. दिल्लीत राहणारे वैभव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. "मी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं होतं. पण मला अभ्यासात अजिबात रस नव्हता. सुरुवातीपासून मी बॅकबेंचर विद्यार्थी होतो. मला बीटेक पूर्ण करण्यासाठी 5 वर्षं लागली, व मला केवळ 56 टक्के गुण मिळाले होते" असं म्हटलं आहे.
बीटेक पूर्ण केल्यानंतर वैभव यांनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्स विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. या वेळी त्यांच्या मनात पहिल्यांदाच यूपीएससीची परीक्षा देण्याचा विचार आला, आणि शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. यूपीएससीची तयारी करताना त्यांना तब्बल 8 वेळा अपयश आलं; पण त्यांनी हिंमत सोडली नाही. याच काळात, त्यांचा अपघात झाला, व त्यात पाठीला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट सांगितली होती.
कठीण काळातही त्यांनी अभ्यास थांबवला नाही. अखेर वैभव यांच्या कष्टाला यश आलं, व ते 2018 मध्ये यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाले. वैभव यांनी यशानंतर तुमचं मनोधैर्य कधीही खचू देऊ नका आणि ध्येय मिळवण्यासाठी लढत राहा असं म्हटलं आहे. त्यांची या सक्सेस स्टोरीने अनेकांना प्रेरणा मिळाली असून सध्या ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.