वैदिक हे संघाचे सदस्य - राहुल गांधी
By admin | Published: July 15, 2014 12:05 PM2014-07-15T12:05:13+5:302014-07-15T14:19:54+5:30
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेणारे वेद प्रकाश वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५- मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची भेट घेणारे वेद प्रकाश वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तर भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून संघ प्रवक्त्यांनीही हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे कट्टर समर्थक वेदप्रताप वैदिक यांनी पाक दौ-यात हाफीज सईदची भेट घेतली होती. यामुळे वाद निर्माण झाला असून काँग्रेसने याभेटीविषयी केंद्र सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी राज्यसभा व लोकसभेत केली आहे. मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या भेटीवर भाष्य केले. गांधी म्हणाले, सईदची भेट घेण्यासाठी वैदिक यांना भारतीय दुतावासाकडून मदत झाली असेल तर यावर केंद्र सरकारने यावर उत्तर द्यायलाच पाहिजे.
दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरु होताच मंगळवारीही काँग्रेसने सईद - वैदिक भेटीवर केंद्र सरकारने उत्तर देण्याची मागणी लावून धरली. यामुळे संसदेचे कामकाज दोन तहकूब करावे लागले. संसदीय कामकाज मंत्री वैंकेय्या नायडू यांनी या भेटीशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसल्याचे लोकसभेत स्पष्ट केले. सरकार यावर उत्तर द्यायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी संघाचे वैदिक यांच्याशी संबंध नाही असे स्पष्ट केले. मणिशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीद यांच्यासोबत फिरणारी व्यक्ती संघाशी संबंधीत असूच शकत नाही असे सांगत त्यांनी प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.