Vaishno Devi Bhawan Stampede: दगड पडल्याची अफवा पसरली आणि वैष्णौदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयावह अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 12:31 PM2022-01-01T12:31:43+5:302022-01-01T12:33:10+5:30
Vaishno Devi Bhawan Stampede: जम्मूमधील कटरा येथील वैष्णौदेवी मंदिरामध्ये भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० इतर जण जखमी झाले आहेत. ही चेंगराचेंगरी मंदिराच्या गर्भगृहाबाहेर गेट नंबर ३ जवळ झाली होती.
जम्मू - जम्मूमधील कटरा येथील वैष्णौदेवी मंदिरामध्ये भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० इतर जण जखमी झाले आहेत. ही चेंगराचेंगरी मंदिराच्या गर्भगृहाबाहेर गेट नंबर ३ जवळ झाली होती. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, ही चेंगराचेंगरी रात्री २.४५ च्या सुमारास दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेमागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते दगड पडल्याच्या अफवेमुळे ही चेंगराचेंगरी झाली.
दुर्घटनेवेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने सांगितले की, माता वैष्णौदेवी भवन मार्गावर खूप गर्दी होती. ही गर्दी पाहूनच भीती निर्माण होत होती. लोकांनी सांगितले की, यामध्ये प्रशासनाची ही चूक आहे की, जेव्हा गर्दी होत होती तेव्हा लोकांना अडवले का गेले नाही. लोक चालत जात होते. लुधियानामधील एका भक्ताने सांगितले की, दर्शनासाठी एवढ्या पावत्या का फाडण्यात आल्या. प्रमाणापेक्षा जास्त पावत्या फाडल्या गेल्यामुळे गर्दी होऊन ही दुर्घटना झाली आहे.
दरम्यान, दर्शनासाठी गेलेल्या गाझियाबादमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबवे, त्यामुळे तिथे गर्दी झाली. तसेच लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळेना. थोड्याशा जागेत लोक येत जात होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान,या घटनेनंतर प्रशासन तातडीने सक्रिय झाले. तसेच घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
वैष्णौदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह हे कटराकडे रवाना झाले आहेत. तर नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.