वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:56 AM2019-06-14T08:56:10+5:302019-06-14T08:56:41+5:30
काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील क्रूर दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर याने पुन्हा जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मुळचा काश्मीरमधील रहिवासी असलेला मुश्ताक अहमद जरगर हा जैश-ए-मोहम्मद आणि अल-उमर-मुजाहिदीन यांच्यात समन्वय साधण्याचं काम करतो. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्याच काम जरगर करत असतो.
काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षायंत्रणांनी केलेल्या गोळीबारात जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत. भारतीय विमानाला हायजॅक केल्यामुळे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मुश्ताक अहमद जरगरला मुक्त केलं होतं. बुधवारी अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताकचा सहभाग असल्याचं आता समोर येत आहे. अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताक अहमदची महत्वाची भूमिका होती.
अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 24 डिसेंबर 1999 दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं. त्यात 176 प्रवासी आणि 15 हवाई कर्मचारी होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी सरकारकडे कैदेत असलेल्या 35 दहशतवाद्यांची सुटका तसेच 200 मिलियन अमेरिकी डॉलर्सची मागणी केली होती. सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य केली त्यानंतर 3 दहशतवाद्यांना सोडण्याच्या अट सरकारकडून दहशतवाद्यांना घालण्यात आली. वाजपेयी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री जसवंत सिन्हा स्वत: मसूद अजहर, अहमद जरगर, शेख अहमद उमर सईद यांना घेऊन प्रवाशांची सुटका करण्यासाठी गेले होते.
अनंतनाग येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले तर अन्य 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनंतनाग दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अहमद जरगर याला मानलं जातंय. या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे.
सूत्रांची माहिती अशी आहे की, अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत एकट्याने असा हल्ला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी हातमिळवणी करुन अल-उमर-मुजाहिदीनने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला असावा. जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरविण्यासाठी या दोन्ही दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद अहमद जरगर हातपाय पसरण्याचं काम करत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद https://t.co/Lu2b8TYkqt
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2019