'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 19:00 IST2025-04-13T18:59:34+5:302025-04-13T19:00:31+5:30
विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत...

'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच केलेल्या वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंसाचार उसळला आहे. यानंतर अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून १५० जणांना अटक करण्यात आली आहे. यामुद्द्यावरून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील हिंसाचाराचा उल्लेक करत विरोधकांवर हिंसा भडकवण्याचा आरोप केला. तसेच, तेथे तीन हिंदूंची घरातून ओढून निर्घृन हत्या केली गेली, असे म्हटले आहे. ते लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
लखनौ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानांतर्गत आयोजित प्रदेश कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'वक्फ कायद्यावरून हिंसाचार भडकवला जात आहे. मुर्शिदाबादमध्ये तीन हिंदूंची घरातून बाहेर काढून निर्घृण हत्या करण्यात आली. हे लोक कोण आहेत? दलित, वंचित आहेत. त्यांना या जमिनीचा लाभ मिळणार आहे. जर ही जमीन महसूल नोंदींमध्ये परत आली तर गरीबांनाच उंच इमारतीचा फायदा मिळेल. एक चांगला फ्लॅट मिळेल.'
'विरोधकांना भीती वाटतेय' -
विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत.
सीएएचा उल्लेख करत योगी म्हणाले, 'जर जगात कुठेही हिंदूवर अत्याचार झाला तर तो भारतात येईल. मात्र, काँग्रेस-सपा आणि तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष नेहमीच याला अडथळा निर्माण कत आले. त्यांनी नेहमीच अशा लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचे काम केले. त्यांना निर्वासित म्हणून ठेवण्यात आले होते, मात्र भाजपने त्यांचा स्वीकार केला. याच पद्धतीने हे लोक वक्फ कायद्यावरूनही हिंसाचार करत आहेत.