‘बेजबाबदार’ जनहित याचिकेसाठी वकिलास नोटीस
By admin | Published: May 1, 2015 10:41 PM2015-05-01T22:41:40+5:302015-05-01T22:41:40+5:30
राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या (एनजेएसी) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेतील आरोप ‘बेजबाबदार ’ आणि ‘अपमानास्पद’ असल्याचे सांगत सर्वोच्च
नवी दिल्ली : राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या (एनजेएसी) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेतील आरोप ‘बेजबाबदार ’ आणि ‘अपमानास्पद’ असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संबंधित याचिकाकर्त्यास नोटीस जारी केले. हे राजकीय व्यासपीठ नसल्याचेही न्यायालयाने यावेळी बजावले.
पेशाने वकील असलेले एम.एल. शर्मा यांनी संबंधित जनहित याचिका दाखल केली होती. न्या. जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने शर्मा यांना नोटीस जारी केले. आठवडाभरात नोटीसचे उत्तर देण्याचे न्यायालयाने बजावले. रिट याचिकेवर विचार केल्यानंतर आमचे मत आहे की, याचिकाकर्ते शर्मा यांना नोटीस जारी केली जावी. आपल्या जनहित याचिकेत त्यांनी अतिशय बेजबाबदार व अपमानास्पद आरोप केले आहेत. यासाठी त्यांच्यावर जनहित याचिका मांडण्यासाठी बंदी का आणली जाऊ नये? अशी विचारणा न्यायालयाने यावेळी केली. शर्मा सर्वोच्च न्यायालयात अनेकदा जनहित याचिका दाखल करतात. आपण कुठल्याही ठिकाणावरून कुणाविरुद्धही आरोप लावू शकतो, कदाचित असे याचिकाकर्त्यास वाटते. पण हे काही राजकीय व्यासपीठ नाही, अशा शब्दांत न्यायालयाने शर्मा यांच्यावर ताशेरे ओढले.(वृत्तसंस्था)