Valentine Day 2023: प्रेम असावं असं..! व्हॅलेंटाईन दिनी पतीने पत्नीला किडनी देऊन वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:26 PM2023-02-14T14:26:00+5:302023-02-14T14:26:22+5:30
Valentine Day 2023 : राजधानी दिल्लीतून प्रेमाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
Valentine Day 2023 : व्हॅलेंटाईन डे(Valentine Day) हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी प्रेयसी आणि प्रियकर किंवा पती-पत्नी आपल्या पार्टनरला खास भेट देतात. दरम्यान, राजधानी दिल्लीतील एका रुग्णालयातून व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला पती-पत्नीमधील प्रेमाचे अतूट उदाहरण पाहायला मिळाले.
दिल्लीतील सुनार इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये सोमवारी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. यावेळी 48 वर्षीय नमती सारा धोंगा यांना त्यांच्या पतीने किडनी दिली. 2 वर्षांपूर्वी नमती सारा धोंगा या रस्त्यावर अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना औषधाचा ओव्हरडोस झाला आणि यामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यांची तब्येत सतत खालावत गेली.
डॉक्टरांनी त्यांना डायलिसिसचा सल्ला दिला. गेल्या 2 वर्षांपासून त्या डायलिसिसवर होत्या, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. सोमवारी व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला पतीने किडनी दिली आणि पत्नीचा चीव वाचवला. या ऑपरेशननंतर पती रामकुमार थापा यांनी देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानले.