नरेंद्र मोदींच्या सूटची किंमत ४.३१ कोटी
By admin | Published: August 21, 2016 03:53 AM2016-08-21T03:53:54+5:302016-08-21T03:53:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादग्रस्त सूटची ‘सर्वाधिक किमतीत विक्री झालेला’ सूट म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तो सूट लिलावामध्ये ४ कोटी ३१ लाख
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादग्रस्त सूटची ‘सर्वाधिक किमतीत विक्री झालेला’ सूट म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तो सूट लिलावामध्ये ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकला गेला होता. ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ अशी अक्षरे या सूटवर मोनोग्राफीद्वारे कोरली होती. फेब्रुवारी २0१५ मध्ये या सूटचा लिलाव करण्यात आला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीच्या वेळी मोदी यांनी हा सूट परिधान केला होता. सुरतमधील हिरे व्यापारी व खासगी एअरलाईनरचे मालक लालजीभाई पटेल यांनी ४.३१ कोटी रुपयांना हा सूट खरेदी केला होता. हा सूट विक्रीला ठेवला होता, त्याची आधार किंमत ११ लाख होती. विदेशात राहणारे व्यावसायिक रमेश विराणी यांनी मुलाच्या लग्नात मोदी यांना सूट दिला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सूटमुळे झाली टीका
पंतप्रधान मोदींना हा सूटच विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर ‘सूट बूट की सरकार’ अशी टीका केली होती. त्यामुळे शेवटी मोदी यांनी हा सूटच लिलावात विकून टाकला. पंतप्रधानांना भेट म्हणून मिळालेल्या अन्य वस्तूही त्याच लिलावात विकण्यात आल्या होत्या.
सूट विक्रीतून आलेला पैसा गंगा शुद्धिकरण प्रकल्पाला देण्याची घोषणा तेव्हा केली होती. या प्रकल्पाला निधी मिळावा, यासाठी मोदी यांना मिळालेल्या इतरही काही वस्तूंचा लिलाव केला होता.