प्रेरणादायी! कुटुंबीयांचा शिक्षणाला विरोध, घरी राहून केली UPSC ची तयारी; झाली IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:58 PM2023-07-11T15:58:13+5:302023-07-11T16:04:31+5:30
वंदना सिंह चौहान यांना शिक्षणासाठी आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले. मनात काही करण्याची इच्छा असेल तर मार्ग मिळतोच हे आयएएस अधिकारी वंदना यांनी सिद्ध केलं आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. घरच्यांनी शिक्षणाला विरोध केला पण ती घाबरली नाही तर जिद्दीने अभ्यास करून मोठी अधिकारी झाली आहे. आजही अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे मुलींच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. वंदना सिंह चौहान यांना शिक्षणासाठी आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले. मनात काही करण्याची इच्छा असेल तर मार्ग मिळतोच हे आयएएस अधिकारी वंदना यांनी सिद्ध केलं आहे.
वंदना सिंह चौहान यांचा जन्म 4 एप्रिल 1989 रोजी हरियाणातील नसरुल्लागड गावात झाला. त्यांचे वडील महिपाल सिंह चौहान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या गावात चांगली शाळा नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. तेव्हा वंदना त्यांना सतत एकच प्रश्न विचारायच्या की तिला अभ्यासासाठी बाहेर कधी पाठवणार? सुरुवातीला त्यांनी वंदना यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिलं नाही.
एके दिवशी वंदना यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की, ती मुलगी आहे आणि त्यामुळे तिचे वडील तिला बाहेर पाठवत नाहीत. यानंतर त्यांनी वंदना यांना मुरादाबाद येथील गुरुकुलमध्ये पाठवलं. त्यानंतर वंदना यांचे आजोबा, काका आणि कुटुंबातील इतर सदस्य महिपाल सिंह यांच्या विरोधात गेले. बारावीनंतर वंदना यांनी कायद्याच्या अभ्यासासोबत घरीच राहून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. आयएएस अधिकारी होण्याच्या त्यांच्या ध्येयाबाबत त्या अत्यंत ठाम होत्या.
वंदना सिंह दररोज 12-14 तास अभ्यास करायच्या. वंदना यांनी आग्रा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठात एलएलबीसाठी प्रवेश घेतला होता, परंतु कुटुंबाचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावं लागलं. याच दरम्यान त्यांच्या भावाने त्यांना खूप साथ दिली. वंदना सिंह चौहान यांनी 2012 मध्ये हिंदी माध्यमातून UPSC परीक्षा देऊन 8 वी रँक मिळवली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.