वंदे भारत' एक्स्प्रेस भगव्या रंगात का? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक कारण, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:34 PM2023-10-05T17:34:02+5:302023-10-05T17:34:57+5:30
वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. सध्या भारताच्या विविध भागात ३० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस निळ्या आणि भगव्या रंगात रेल्वे रुळांवर धावत आहे. यावरूनही सध्या राजकारण सुरू आहे. वंदे भारत ट्रेनवरून भगवा हाच सरकारचा अजेंडा असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर आता रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनचा रंग भगवा असण्याला शुद्ध वैज्ञानिक तर्क असल्याचे म्हटले आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचेही ते म्हणाले. हा पूर्णपणे वैज्ञानिक तर्क आहे. देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारतचा रंग भगवा होण्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे सांगत अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यामागे पूर्णपणे शास्त्रीय कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, विज्ञानानुसार मानवी डोळ्याला पिवळा आणि भगवा असे दोन रंग सहज दिसतात. यामुळेच युरोपमधील 80 टक्क्यांहून अधिक गाड्या एकतर भगव्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात. या दोन रंगांव्यतिरिक्त, चांदीसारखे आणखी काही रंग आहेत, जे पिवळ्या आणि भगव्यासारखे चमकदार आहेत, परंतु जर आपण आपल्या डोळ्यांबद्दल बोललो तर हे दोन रंग डोळ्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात.
याच कारणामुळे विमाने आणि जहाजांचे ब्लॅक बॉक्स देखील भगव्या रंगाचे असतात. तसेच, एनडीआरएफने वापरलेल्या रेस्क्यू बोटी, लाईफ जॅकेट यासारख्या गोष्टीही भगव्या रंगाच्या असतात, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या रेल्वेत आरामदायक खुर्ची आणि इतर अनेक सुविधा आहेत. वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.